

पुढारी ऑनलाईन डेस्क
देशातील कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. पण कोरोना मृतांचा वाढता आकडा कायम आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६७ हजार ८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,२४१ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात १ लाख ६७ हजार ८८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ७ लाख ९० हजार ७८९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पॉझिटिव्हिटी रेट ४.४४ टक्क्यांवर आला आहे. देशात आतापर्यंत ५ लाख ६ हजार ५२० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
याआधीच्या दिवशी ७१ हजार ३६५ कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर, १ हजार २१७ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, १ लाख ७२ हजार २११ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. पंरतु, कोरोनामृत्यूची वाढती संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९६.७० टक्क्यांवर होता. दैनंदिन कोरोनासंसर्गदर ४.५४ टक्के तर, आठवड्याचा कोरोना संसर्गदर ७.५७ टक्के नोंदवण्यात आला होता.
देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १७१ कोटी २८ लाख १९ हजार ९४७ डोस देण्यात आले आहेत. यातील ५३.६१ लाख डोस मंगळवारी दिवसभरात देण्यात आले होते. खबरदारी म्हणून आतापर्यंत १.५७ कोटी बूस्टर डोस आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच ६० वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिकांना देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १६८ कोटी ९९ लाख ७३ हजार ४२५ डोस पैकी १२ कोटी ११ लाख ७७ हजार १६६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील केवळ ११ जिल्ह्यांमध्ये ७० टक्के संपूर्ण लसीकरण झाले आहे.
तामिळनाडूत ३,९७१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २८ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकात बुधवारी ५,३३९ नवे रुग्ण आढळून आले. तर ४८ जणांचा मृत्यू झाला. गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोनाने १० हजार ७४० जणांचा बळी घेतला आहे.
आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन करून ११ फेब्रुवारीपासून नेपाळचे पशुपतीनाथ मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. मंदिरात एका वेळी फक्त ५० भाविकांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे पशुपती एरिया डेव्हलपमेंट ट्रस्टने म्हटले आहे.