अभिनेते अमोल पालेकर यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल | पुढारी

अभिनेते अमोल पालेकर यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क

दिग्गज ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमोल पालेकर (Amol Palekar) यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांची पत्नी संध्या गोखले यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. आधीपेक्षा त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीची चिंता करण्यासारखी बाब नाही.

त्या म्हणाल्या की, त्यांच्या प्रकृतीत आधीपेक्षा सुधारणा होत आहे. त्यांना त्यांच्या जुन्या आजाराच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १० वर्षांपूर्वीदेखील त्यांना याच आजारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पालेकर यांनी शांतता! कोर्ट चालू आहे (१९७१) मधून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. ७० आणि ८० च्या दशकात गोलमाल, घरोंदा, रंग-बिरंगी, श्रीमान श्रीमती, रजनीगंधा, चितचोर, नरम गरम, भूमिका, छोटी सी बात, सावन यासारख्या चित्रपटांतून त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली.

२४ नोव्हेंबर, १९४४ रोजी मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला होता. पालेकर यांनी पहिली पत्‍नी चित्रा पालेकर यांच्याशी घटस्फोट घेतला होता. संध्या गोखले यांच्याशी दुसरे लग्न केले.

त्यांना शानदार दिग्दर्शनासाठी ५ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांना मुख्य भूमिकेत घेऊन २००५ मध्ये रिलीज झालेला ‘पहेली’ या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले होते. ‘आंखें’ नावाच्या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवले. अभिनेता म्हणून त्यांनी स्वत: काम केले होते.

Back to top button