Sangli : आता तोडीसाठी फडाला काडी | पुढारी

Sangli : आता तोडीसाठी फडाला काडी

सांगली पुढारी वृत्तसेवा ःजिल्ह्यात ऊसतोडीसाठी अपुर्‍या टोळ्या, तोडणी यंत्रणेत असलेले राजकारण, स्लीप बॉय आणि ट्रॅक्टर मालकांकडून मिळणारी वागणूक, वाळू लागलेला ऊस यामुळे ऊसउत्पादक शेतकरी निराश झाले आहेत. हा हतबल उत्पादक आपल्या काळजावर धोंडा ठेवून तोडीसाठी फडाला काडी लावतो आहे. जिल्ह्यात वारणा आणि कृष्णा पट्ट्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. या भागातील शेतकर्‍यांचे वर्षाचे आर्थिक गणित उसातून मिळणार्‍या उत्पन्नावर अवलंबून असते. मात्र, गेल्या वर्षीच्या महापूर आणि अतिवृष्टीचा उसाला मोठा फटका बसला. पुराच्या पाण्यात सहा ते सात दिवस ऊस बुडाला होता. परिणामी उसाला तुरे फुटले आहेत. त्यामुळे बाधित ऊस प्राधान्याने तोडणे गरजेचे होते. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही गावचे राजकारण उसाच्या फडापर्यंत आले आहे. अनेकवेळा धनदांडग्यांना तोड अगोदर दिली जात आहे. त्यामुळे सामान्य शेतकरी हताश झाले आहेत. (Sangli)

तीन महिन्यांपासून जिल्ह्यात ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, दोन महिन्यांत जिल्ह्यात वारंवार पडलेला अवकाळी पाऊस, तोडीसाठी असणारी अपुरी यंत्रणा, यामुळे आजही शेकडो एकर ऊस उभा आहे. आता हंगाम निम्म्यावर आला. मात्र, आडसाली लागणीलाही तोडी मिळत नाही. यामुळे उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. तोड लांबत चालल्याने उसाच्या वजनात घट होण्याची भीती त्यांना सतावते आहे.सोळा – सतरा महिने दिवसरात्र काबाडकष्ट करून पिकवलेला ऊस गाळपासाठी घालवताना शेतकर्‍यांना अनेकांच्या हातापाया पडावे लागते आहे. तोडीसाठी कारखान्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून शेतकरी वैतागले आहेत. आता त्यांना एकरी दोन ते तीन हजार रुपये द्यावे लागत आहेत. स्लीप बॉय, मुकादम आणि वाहन चालक या सार्‍यांचा तोरा हा वेगळाच विषय. एका बाजूला नैसर्गिक संकट आणि दुसर्‍या बाजूला यंत्रणेने केलेली कोंडी, यामुळे ऊस उत्पादक हतबल झाले आहेत. तर वेळेवर तोड मिळत नसल्याने फडातच ऊस वाळू लागला आहे. त्यामुळे हताश झालेले काही शेतकरी निराशेतून स्वतःच उसाला काडी लावत आहेत. जिल्ह्यात रोज कुठेतरी उसाला आग लागल्याच्या घटना घडत आहेत. (Sangli)

मिरज तालुक्यातील कवठेपिरान – दुधगाव रस्त्यावरील सुमारे 250 एकर उस मंगळवारी खाक झाला. यात उत्पादकांचे लाखोंचे नुकसान झाले. तोड मिळत नसल्याने हतबल झालेल्या एखाद्याने उसाला काडी लावल्याची चर्चा या भागात आहे. खरे तर जळालेला ऊस कारखान्यांकडून प्राधान्याने नेण्यात येतो. मात्र प्रतिटनाला 250 रुपयांची कपात केली जाते. किमान 48 तासांच्या आत जळालेला ऊस गाळपे होणे गरजेचे आहे, अन्यथा दर दिवसाला किमान 10 ते 15 टन वजनात घट होण्याची शक्यता असते, असे जाणकारांनी सांगितले. मात्र फडातच ऊस वाळू लागल्याने चार रुपये तरी पदरात पडतील, या आशेने उत्पादक फडाला काडी लावत आहेत. मात्र, जळालेल्या उसाला एकरी 30 ते 35 हजार रुपयांचा फटका बसतो. यामुळे शिल्लक राहिलेल्या उसाची तोड करण्यासाठी प्रत्येक साखर कारखान्याने तोडणी यंत्रणा वाढवण्याची मागणी होत आहे. (Sangli)

जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना स्वतःचा ऊस गाळपासाठी घालवण्यासाठी फडाला काडी लावावी लागते, ही कारखानदार, लोकप्रतिनिधी आणि स्वतःला शेतकर्‍यांचे कैवारी म्हणून मिरवणार्‍या शेतकरी संघटनांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. जिल्ह्यात दरवर्षी हंगामात तोडीसाठी शेतकर्‍यांना झगडावे लागते. प्रत्येक वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन कारखान्यांनी यंत्रणा वाढवायला हवी होती. तसेच यासाठी या संघटनांनी पाठपुरावा करण्याची गरज होती. मात्र, कोणाकडूनच काहीच पाठपुरावा होत नसल्याने ऊसउत्पादकांवर फड पेटवण्याची वेळ आली आहे. (Sangli)

अनेक कारखानदारांची डोळेझाक

जिल्ह्यात आगीने भस्मसात झालेला ऊस नेण्यासाठी अनेकवेळा कारखाने टाळाटाळ करतात. यातून शेतकर्‍यांना मोठा फटका बसतो. गेल्या आठवड्यात सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील जळीत उसाची तोड युद्धपातळीवर यंत्रणा राबवून केली. यातून त्या शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला. ‘सोनहिरा’ ने ज्या प्रकारे असा ऊस उचलला त्या पद्धतीने अन्य कारखान्यांनी जळीत ऊस तोडण्यासाठी यंत्रणा राबविण्याची मागणी होत आहे. (Sangli)

महावितरणला कधी येणार जाग?

जिल्ह्यात प्रत्येक वर्षी हंगामात उसाच्या फडाला महावितरण कंपनीच्या तारांच्या घर्षणामुळे झालेल्या शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागते. याही वर्षी अनेक भागात असे प्रकार गेल्या काही दिवसांत घडले आहेत. अनेकवेळा कायद्याचे बोट दाखवून पंचनामेच केले जात नाहीत. तसेच ज्या क्षेत्राचे पंचनामे होतात त्यांची मिळणारी भरपाई आणि नुकसान यामध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊ नये तसेच यासाठी महावितरणकडून उपाययोजना करण्याची गरज आहे, तशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. (Sangli)

हेही वाचलतं का?

Back to top button