Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या अस्थींचे नाशिकमध्ये विसर्जन | पुढारी

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या अस्थींचे नाशिकमध्ये विसर्जन

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांच्या अस्थींचे विसर्जन देशातील पवित्र नद्यांमध्ये करण्यात येत आहे. नाशिकमध्येही रामकुंड येथे गुरूवारी (दि. १०) सकाळी १० वाजता लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. याकरीता जिल्हा प्रशासन सज्ज असून, नाशिककरांना अस्थीदर्शन घेता येणार आहे.

लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांचे दि. ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. दादरच्या शिवाजी पार्कवर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसागर लोटला होता. ज्यांना अंत्ययात्रेत सहभागी होता आले नाही, त्यांना अस्थिकलशाचे दर्शन घेता येणार आहे. लता दिदींच्या अस्थी गुरूवारी सकाळी ८ वाजता रामकुंड येथे विसर्जनासाठी आणण्यात येणार आहे. १० वाजेपर्यंत अस्थीकलशाचे दर्शन झाल्यानंतर अस्थींचे रामकुंडमध्ये विधिवत पूजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, मिलिंद नार्वेकर व आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

लता दिदींच्या अस्थीविसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी गोपनीय शाखेच्या पथकासह रामकुंड परिसराची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आढावा घेतला. गुरूवारी सकाळपासून अस्थीविसर्जन होईपर्यंत मालेगाव स्टँड, ढिकले वाचनालाय, खांदवे सभागृह, दुतोंडया मारुती व यशवंत महाराज पटांगणाकडून रामकुंडाकडे जाणारे सर्व रस्ते चारचाकी वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच, रामकुंड परिसरात बॅरिकेडिंग करण्यात येणार असून, या वेळेत पार्किंगलाही निर्बंध आहेत.
– डॉ. सिताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंचवटी पोलीस ठाणे

जिल्हा-पोलिस, मनपा प्रशासन सज्ज ( Lata Mangeshkar )

मंगेशकर कुटुंबिय गुरूवारी नाशिकमध्ये उपस्थित राहणार असून, याकरीता शासकीय विश्रामगृह आरक्षित करण्यात आले आहे. तसेच, मंगेशकर कुटुंबियांच्या सांगण्यानुसार धार्मिक विधी पार पडणार आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. बुधवारी दुपारी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, तसेच गोपनीय शाखेचे शेखर फरताळे, राजेश सोळसे, अंकुश सोनजे यांच्या पथकाने रामकुंड परिसराची पाहणी केली. मनपाच्या वतीने रामकुंड परिसराची स्वच्छताही करण्यात आली.

 

Back to top button