

वास्को ; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने गोव्याकडे सदैव दुर्लक्ष करून विकासापासून वंचित ठेवले. गोव्याला पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त करण्यासाठी काँग्रेसने कधीच पुढाकार घेतला नाही. याला पूर्णपणे पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी केला. वास्को सडा (जि. दक्षिण गोवा) येथील सभेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले दहा वर्षे स्थैर्य, विकासकामे, सामाजिक सुरक्षा व गोव्याला आधुनिकतेकडे नेण्याचे पूर्ण श्रेय भाजपला जाते. भाजप लोककल्याणकारी योजना देणारा व विकासकामे करणारा पक्ष आहे.
दिवंगत भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर आधुनिक गोव्याचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर असून, त्यांच्या आशीर्वादाने गोव्यात भाजप पुन्हा एकदा बहुमताने विजयी होईल.
भाजपने विविध योजनेतून जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. येथील विकासकामांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने चार हजार कोटी रुपये दिल्याने गोव्याचा चौफेर विकास होत आहे.
यावेळी आमदार मिलिंद नाईक, वासुदेव काळे, माजी मंत्री प्रणव पुके, धनंजय महाडिक, नगराध्यक्ष दामोदर कासकर, संजय सातार्डेकर, छाया होन्नावरकर, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बांदोडकर आदी उपस्थित होते.