उसाला तुरे फुटल्याने शेतकरी आतबट्ट्यात | पुढारी

उसाला तुरे फुटल्याने शेतकरी आतबट्ट्यात

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सध्या जिल्ह्यात उसाची तोड मोठ्या प्रमाणात सुरू असली तरीही टोळ्यांचा तुटवडा असल्याने अनेकांच्या उसाला तुरे फुटलेले दिसत आहेत. यामुळे वजनात घट होऊन उत्पादकाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या अनेक तालुक्यांमध्ये अशी स्थिती असून टोळ्यांअभावी ऊसतोडी उशिरा होत आहेत. त्यामुळे अहोरात्र कष्ट करुनही उत्पादकांच्या पदरी निराशा पडण्याची दाट शक्यता आहे.

कोरेगाव, सातारा, वाई तालुके ऊस, आले, हळद व भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहेत. इतर तालुक्यांच्या मानाने हे तालुके सधन मानले जातात. या तालुक्यातील शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. येथील बागायती शेतकर्‍यांचे ऊस हेच पीक उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्याने या पिकांच्या बाबतीत कोणतीही तडजोड करताना शेतकरी दिसत नाहीत. मात्र, यावर्षी उसाच्या पिकाला कालावधी पूर्ण होण्याआधीच तुरे फुटल्याने उत्पन्नात मोठा फटका बसणार असून बळीराजा पूर्णपणे अडचणीत येणार आहे.

त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील सभासद तसेच बिगर सभासद यांचा ऊस वेळेत नेण्याची मागणी होत आहे. सातारा-कोरेगाव-वाई आदी तालुक्यातील बळीराजाची सर्व भिस्त आता ऊसाच्या पिकावरच आहे. त्यालाच तुरे फुटल्याने उसाचे वजन कमी भरून उत्पादनात मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऊसाला आलेल्या तुर्‍यांमुळे शेतात सगळीकडे निळसर पांढरी चादर पसरली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उसाच्या तुर्‍यांमुळे संकटात आलेला बळीराजा हवालदिल झाला असतानाच अनेक साखर कारखाने ऊस बिलही वेळेत देत नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडत आहे.

चार्‍याचा प्रश्न वाढणार

ऊस तसे इतर पिकांच्या तुलनेत प्रचंड खर्चिक व जास्त कालावधीचे पीक असल्याने उत्पादनात घट झाली तर शेतकरी पूर्णपणे अडचणीत येतो. उसामुळे शेतकर्‍यांना जनावरांच्या खाद्याचा प्रश्न भेडसावत नाही, ज्वारी पिकाने ओढ दिल्यास शेतकरी जनावरांच्या चार्‍यासाठी उसावरच अवलंबून राहतो. आता तुरे आल्याने जनावरांचा चारा सुध्दा धोक्यात आल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात दिसत आहे. या सर्वच तालुक्यातून साखर कारखान्यांनी ऊसतोड टोळ्या वाढवाव्यात, अशी मागणी ऊस उत्पादकांमधून होत आहे.

Back to top button