लष्करातील जवानाने पत्नीस जिवंत जाळले | पुढारी

लष्करातील जवानाने पत्नीस जिवंत जाळले

बीड : प्रतिनिधी 

हिमाचल प्रदेशात सैन्यदलामध्ये कार्यरत असलेल्या आष्टी तालुक्यातील हिवरा गावातील शरद नामदेव लगड (वय ३६) याने पत्नी गितांजली (वय ३०) हिला शेतात नेऊन जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शुक्रवार दि.२९ च्या रात्री ते दि. ३० डिसेंबरच्या पहाटे घडली. या खूनाचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. 

याबाबत आज सकाळी शरद यानेच अंभोरा पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक मिर्झा वहाब बेग यांनी सहकार्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दुपारी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजीत पाटील यांनीही भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. 

शरद लगड यांची सैन्यदलात १० वर्षे नोकरी झाली आहे. नोकरीपूर्वी २ वर्ष अगोदर नगरा तालुक्यातील सांडवा-मांडवा येथील गितांजली सोबत विवाह झाला होता. त्यांना ६ वर्षाची मुलगी असून कडा येथील महावीर इंग्रजी शाळेत शिक्षण घेत आहे.

शरद लगड याचे विरूध्द भा.द.वि. ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने हिवरा परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमागील पार्श्वभूमीबाबत गावात कोणीही काहीही  सांगत नाही.

Back to top button