नागपुरात मुसळधार! ३६ गावे प्रभावित; १४ हजार नागरिकांना सुरक्षितस्‍थळी हलविले | पुढारी

नागपुरात मुसळधार! ३६ गावे प्रभावित; १४ हजार नागरिकांना सुरक्षितस्‍थळी हलविले

नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नागपूर लगतच्या नद्यांना पूर आला आहे. त्‍यामुळे नागपूर जिल्ह्यातील ३६ गाव प्रभावित झाली आहेत. तर या गावातील तब्बल १४ हजार नागरिकांना रविवारी ( दि ३०) दुपारपर्यंत सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मागील २५ वर्षातील ही सर्वात मोठी पुर परिस्थिती असल्याचे काही जेष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून विदर्भातील बहुतांश मोठ्या धरणाचे दरवाजे शनिवारीच (दि.२९) उघडले होते. नागपूर जिल्ह्यातील पेंच, तोतलाडोह, चौराई या प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. नागपूर ते भंडारा दरम्यान असलेली कन्हान नदी दुथडी भरून वाहत असल्याने कन्हान नदीच्या तिरावर असलेल्या गावांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. 

या नदीचे पाणी काही गावात घुसल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. विशेषतः कामठी, कन्हान, कुही आणि उमरेड तालुक्यातील गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. फटका बसलेल्या गावांना प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांकडून मदतकार्य सुरू आहे. तर गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे बचाव कार्य मागील २४ तासापासून सुरू आहे. या गावात बचावकार्य करण्यासाठी लष्कराची एक विशेष तुकडी तैनात करण्यात आली आहे. लष्कराच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युध्द पातळीवर हाती घेण्यात आले आहे. 

बिना कामठी या गावात 33 लोकं एका उंच टापूवर स्वतः चा जीव वाचवण्यासाठी बसले होते. या टापुच्या चोहीकडे २ किलोमीटर पर्यंत पाणीच पाणी साचले होते. टापुवर अडकून असलेल्या या सर्व नागरिकांना सुरक्षितरित्या पाण्याबाहेर काढण्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला यश आले आहे. तसेच एक दाम्पत्य फार्म हाऊस मध्ये आणि तीन लोकं मंदिरा मध्ये अडकलेले होते. त्यांना बाहेर काढण्याकरिता एअर लिफ्टिंगची मदत घेण्यात आली. त्यांना सुद्धा पाण्याबाहेर काढण्यात यश आले. 

सतत २४ तास बचाव अभियान राबवून २५ ते ३० फुट पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकाने दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील चिकना गावाला चोही बाजूने १५ फूट पाण्याचा वेढा घातला होता. तेथे सुमारे एक हजारावर लोकांना  दोन बोटींच्या मदतीने बचाव अभियान करून लोकांना सुरक्षित बाहेर काढले.

कन्हान नजीक नाथ नगरमधील अनेक घरात पाणी शिरल्याने तेथील रहिवाश्यांना सुरक्षी स्थळी हलविले आहे. त्यांना गावातील शाळा आणि मंदिरात निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यात सतत पावसा मुळे सावनेर  तालुक्यातील कौल्हार  नदीला पूर आला आहे. त्यामुळे पटकाखैडी व आगेवाडाच्या  पुलावरून पाणी वाहत असून, वाहतूक व्यवस्था कोलमडल्‍याने एका गावातून दुसऱ्या गावी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. 

Back to top button