पन्हाळगडावर ढगफुटीसदृष्‍य पाऊस | पुढारी | पुढारी

पन्हाळगडावर ढगफुटीसदृष्‍य पाऊस | पुढारी

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा

पन्हाळगड व परिसरात आज  सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अगदी पाच मिनिटात ढगफुटी सदृश्य पावसाने विजांच्या कडकडाटासह थैमान घातले. पन्हाळगडावर अनेक वर्षानंतर असा मुसळधार पाऊस बरसला.

अगदी वीस मिनिटात सर्वत्र ओढे-नाले दुथडी भरून वाहायला लागले. पावसाचा जोर इतका होता की, रस्त्यावरून पाणी वाहू लागले. रस्त्यावर उभ्या असणाऱ्या दुचाकी गाड्या देखील पाण्याबरोबर प्रवाहित झाल्या, तर प्रवासी कर नाका येथे सादोबा तलावाची भिंत पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तलावात ढासळली. धडकी भरवणाऱ्या मुसळधार पावसाने  पन्हाळगडावरील सोमेश्वर तलाव,सादोबा तलाव, माणिक बाग, खोकड  तलावांची पाणी पातळी दहा मिनिटात दोन फुटाने वाढली. बुधवार पेठ येथे असणाऱ्या हॉटेल ग्रीन पार्क मध्ये संरक्षक भिंती भेदून पाण्याचा जोरदार प्रवाह हॉटेल मध्ये घुसला. 

रेडे घाटी परिसरातून पाण्याच्या प्रवाहाबरोबर आलेले दगड-गोटे मुख्य रस्त्यावर पसरले. त्यामुळे हा रस्ता बंद झाला. पन्हाळगडावर गेल्या अनेक वर्षात असा ढगफुटी सदृश्य पाऊस पाहिला नसल्‍याचे नागरिकांनी सांगितले. अशा प्रकारचा  मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट प्रथमच अनुभवल्याचे अनेक जाणकारांनी सांगितले. 

Back to top button