

सावंतवाडी पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून कुटुंबीय व माझ्या वकिलांशी चर्चा करून सरेंडर झालो. मला कोणीही अटक करू शकले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचे चार दिवसांचे संरक्षण असतानाही मी न्यायालयात हजर झालो. सरेंडर झाल्यानंतर व होण्यापूर्वीही मी पोलिसांना संपूर्ण सहकार्य केले व यापुढेही करणार आहे. मात्र, विरोधकांकडून अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे, अशी प्रतिक्रिया आ. नितेश राणे यांनी गुरुवारी जामिनावर सुटका झाल्यानंतर सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले आ. नितेश राणे यांच्यावर कोल्हापूर येथे सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना गुरुवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर जामिनाची पूर्तता करण्यासाठी आ. नितेश राणे फोंडाघाटमार्गे सावंतवाडी जिल्हा कारागृहात दुपारी 2.30 वा. दाखल झाले. (Sindhudurg)
जामिनाची उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना सावंतवाडी जिल्हा कारागृहात प्रत्यक्ष हजर होणे आवश्यक होते. त्यानुसार त्यांनी कारागृहात हजेरी लावली. त्यांच्या जामिनाची प्रक्रिया वीस मिनिटांत पूर्ण होऊन ते बाहेर आले असता कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आ. राणे यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा कारागृहाबाहेरील रस्त्यावर गर्दी केली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना आ. राणे म्हणाले, तब्येतीच्या कारणास्तव मला कोल्हापूर येथे उपचार घ्यावे लागले. मात्र, माझे आजारपण हे 'राजकीय आजारपण' असल्याची टीका काहीजणांनी केली. मग अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा का येतो? तसेच ईडीची चौकशी लागल्यावर महाविकास आघाडीमधील मंत्री, नेते आजारी का पडतात? असा सवाल आम्ही केला, तर योग्य होईल का? असे प्रतिसवाल आ. राणे यांनी विरोधकांना केले. सध्या मी आजारी आहे. उपचारानंतर जेव्हा बोलेन तेव्हा अनेकांचा बीपी कमी होईल, असा टोला लगावला. (Sindhudurg)
आ. राणे म्हणाले, आता पुढील काही दिवस मी आराम करणार आहे. मला मान व पाठदुखीचा तसेच रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यामुळे पडवे येथील रुग्णालयात उपचार घेणार असून त्यानंतर अधिक उपचारासाठी मुंबई येथे जाणार आहे. या प्रकरणामुळे गेल्या दीड महिन्यात मला माझ्या मतदारसंघातील जनतेशी संवाद साधता आला नाही. तसेच पक्षाने मला दिलेली गोव्यातील माझी जबाबदारी मी पार पाडू शकलो नाही; पण उर्वरित काही दिवस मी तेथे देणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी मला देण्यात आली आहे. ती मी पार पाडणार आहे. (Sindhudurg)
यानंतर आ. राणे कणकवलीच्या दिशेने रवाना झाले. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी सभापती पंकज पेडणेकर, रवींद्र मडगावकर, एकनाथ नाडकर्णी, माजी नगरसेवक सुधीर आरिवडेकर, शहराध्यक्ष अजय गोंदावले, जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, जावेद खतीब, महेश धुरी, प्रमोद गावडे, बंटी पुरोहित, कणकवली उपसभापती मिलिंद मेस्त्री, भाजपा कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, सुधा राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, हेमंत मराठे, गोविंद प्रभू, संजय शिरसाट, बाबा मोंडकर, दिलीप भालेकर, मधुकर देसाई, ज्ञानेश्वर सावंत, भाऊ कोळमेकर, शफीक खान, बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, संजय राऊळ, संदीप कुडतरकर आदी उपस्थित होते.आ. नीतेश राणे यांना सावंतवाडी जिल्हा कारागृहात आणण्यात येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. कारागृहाबाहेर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. तर गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी दंगल काबू पथक ही तैनात करण्यात आले होते. (Sindhudurg)
हेही वाचलतं का?