Arvind Kejriwal : चोवीस हजार कोटींचे कर्ज गेले कुठे ? फक्त ‘आप’च देऊ शकते भ्रष्टाचारमुक्त शासन | पुढारी

Arvind Kejriwal : चोवीस हजार कोटींचे कर्ज गेले कुठे ? फक्त ‘आप’च देऊ शकते भ्रष्टाचारमुक्त शासन

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी सत्ताधारी भाजपवर, तसेच विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल केला. गोव्यावर 24 हजार कोटींचे कर्ज आहे, तरी पण सत्ताधारी पक्षांनी गेल्या 25-30 वर्षांत कोणत्याही नवीन शैक्षणिक, आरोग्य सुविधा दिल्या नाहीत. 24 हजार कोटींचे कर्ज गेले कुठे, असा सवाल करून केजरीवाल यांनी केवळ ‘आप’च राज्यात भ्रष्टाचारमुक्त शासन देऊ शकते, असे सांगितले. (Arvind Kejriwal)

केजरीवाल म्हणाले, की, राज्यात दर्जेदार रस्ते नाहीत , शाळा-रुग्णालये बांधण्यासाठी खर्च केला नसेल तर हा पैसा जातो कुठे? तो मंत्र्यांच्या खिशातच जातो. गुरुवारी त्यांनी मये, पर्ये आणि सांताक्रुझ येथे मोठ्या जनसभेला संबोधित केले.या सभेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Arvind Kejriwal : दिल्लीमध्ये प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार

आम्ही दिल्लीमध्ये प्रामाणिक आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करून दाखविले आहे. आम्ही दिल्लीत एका मंत्र्याला दुकानदाराकडून लाच मागितल्याच्या आरोपावरून स्वतःहून काढून टाकले होते, असे नमूद करून केजरीवाल यांनी सांगितले की, ‘आप’ सत्तेत आल्यास भ्रष्टाचारासाठी वापरला जाणार पैसा वाचवून तो जनतेच्या सेवेसाठी वापरला जाईल.

दिल्लीत भ्रष्टाचार थांबविण्यासाठी आम्ही जनतेला सरकारी सेवा घरपोच दिल्या आहेत. गोव्यातही आम्ही अशीच योजना सुरू करणार आहोत. यामुळे जनतेला पंचायतीच्या कामापासून ते मुख्यमंत्र्यांच्या मदतीपर्यंत सर्व काही घरपोच मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

केजरीवाल म्हणाले की, राज्यातील खाण क्षेत्राबाबत अनेकांचे व्यक्तिगत स्वार्थ आहेत. खाणकाम पुन्हा सुरू करणे अशक्य नाही. पण ते पुन्हा सुरू व्हावे, असे सध्याच्या सरकारला वाटत नाही. ‘आप’ सत्तेत आल्यास खाणकाम सहा महिन्यांत पुन्हा सुरू होईल. तोपर्यंत प्रत्येक खाण अवलंबित कुटुंबाला महिन्याला पाच हजार रुपये भत्ता दिला जाईल. याशिवाय सहा महिन्यांत जमीन हक्क दिले जातील.

सर्वांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येईल.आपने दिल्लीत 10 लाख तरुणांना रोजगार दिला आहे. आम्ही गोव्यातही हे करू शकतो .जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत आम्ही दरमहा तीन हजार रुपये बेरोजगारी भत्ता देऊ. याशिवाय महिलांना महिन्याला एक हजार तर गृह आधारासाठी 2500 रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

Arvind Kejriwal : सत्तेच्या नशेत असलेल्यांची राजवट संपवा : पालेकर

‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अमित पालेकर म्हणाले की, सत्तेच्या नशेत असलेल्या राजकारण्यांची राजवट संपवण्याची वेळ आली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी घेतलेले सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस यांनी 90 कोटींची विकासकामे केल्याचा दावा केला आहे.

मात्र या भागात अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. भाजप सरकारच्या विरोधात एक मजबूत अँटी-इन्कम्बन्सी अस्तित्वात आहे. त्याचा सामना करण्यासाठी भाजपने काँग्रेस उमेदवारशी गुप्त करार केला आहे. जनतेने आपले मत वाया न घालविता प्रामाणिक प्रशासन देणार्‍या ‘आप’ला मतदान करावे.

गोव्याला भ्रष्टाचारमुक्त करण्याची गरज ः कळंगुटकर

‘आप’चे मयेचे उमेदवार राजेश कळंगुटकर म्हणाले की, गोव्याला भ्रष्टाचारमुक्त करण्याची गरज आहे. मये मतदारसंघाला तीन प्रमुख समस्या भेडसावत आहेत. त्यात वाढता बेरोजगारीचा दर, पायाभूत सुविधांचा अभाव आणि जमिनीची मालकी यांचा समावेश आहे. ‘आप’ सत्तेत आल्यास सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.

खाणबंदीमुळे जनता दुखावली ः विश्वजीत कृ. राणे

‘आप’चे पर्येचे उमेदवार विश्वजीत कृ. राणे म्हणाले की, खाणबंदीमुळे गोव्यातील आणि पर्येतील जनता दुखावली गेली आहे. प्रतापसिंह राणे हे 50 वर्षे आमदार आणि 17 वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री होते. असे असूनही, पर्येमधील जनतेला मूलभूत गरजा देण्यास ते अपयशी ठरले आहेत.

भाजप आणि काँग्रेसने स्थापन केलेली संरजामशाही व्यवस्था बदलण्याची वेळ आली आहे. केजरीवाल हे शब्द पाळणारे व्यक्ती आहेत. त्यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या विकासकामांसाठी त्यांना दिल्लीतील जनतेने निवडून दिले आहे. पर्येत बदल पाहायचा असेल, तर आपण ‘आप’ला साथ दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

Back to top button