म्हापसा (उत्तर गोवा) ; योगेश मिराशी : गोव्याला स्वर्णमयी गोवा (गोल्डन गोवा) बनविण्यासाठी अस्थिरतावादी काँग्रेसऐवजी विकासवादी भाजपला साथ देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले. (Goa Election)
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारार्थ त्यांची लक्षणीय संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर सभा झाली. यावेळी मंचावर गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांचे मंत्रिमंडळातील अनेक सहकारी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, 2013 मध्ये लोकसभा निवडणूक प्रचार समितीचा प्रमुख म्हणून तसेच पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून गोव्याच्या मातीतूनच माझी घोषणा झाली होती. माझे सहकारी मनोहर पर्रीकर यांनी येथे आयोजित केलेल्या सभेपासून हा प्रारंभ झाला होता.
त्यावेळी 'काँग्रेसमुक्त भारत' हा शब्द मी सहज उच्चारला. आज हाच शब्द देशभरातील कोट्यवधी जनतेचा संकल्प झालेला आहे. माझ्यावर देव बोडगेश्वराची निस्सीम कृपा आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाचे पंतप्रधान मोदी यांनी पुन:पुन्हा कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली विकासयात्रा अशीच सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. स्वच्छ भारत योजना, कोरोना लसीकरण, जलजीवन मोहीम, संपूर्ण राज्यात वीजपुरवठा, मोफत रेशन पुरवठा आदी सर्व संकल्प मुख्यमंत्री सावंत यांनी 100 टक्के पूर्ण केलेले आहेत.
गोवामुक्तीचा खरा इतिहास मी संसदेमध्ये सांगितला. पं. जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे गोवा मुक्त होण्यास 15 वर्षे विलंब झाला. गोव्यातील लोकांना गुलामीत राहण्यास काँग्रेसने मजबूर केले.
काँग्रेसची सत्ता होती. देशाकडे सैन्यबळ होते. जे काम काही तासांत झाले असते, ते काँग्रेसने 15 वर्षांत केले नाही. याच काँग्रेसने गोव्याला राजकीय अस्थिरतेच्या गर्तेत वर्षानुवर्षे ढकलले. त्यामुळे विकासाकडे घेऊन जाणार्या भाजपला तुम्ही साथ द्या, असे आवाहन मोदी यांनी केले.
पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसवरही मोदी यांनी जोरदार हल्लाबोल केला. काही नवे चेहरे गोव्यात आलेले आहेत, अशा शब्दांत त्यांनी या पक्षाचा उल्लेख केला. या चेहर्यांमुळे अस्वस्थता निर्माण होते आहे. त्यांच्याकडे विकासाची कोणतीही दूरद़ृष्टी नाही, असे ते म्हणाले.
गोव्यात नवी सकाळ येण्यासाठी अन्य पक्षांची गरज नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री सावंत यांनी 'टीएमसी'ला टोला लगावला
विजय सरदेसाईंवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, गोंयकारपणाच्या नावाखाली फट, फटिंग आणि फटिंगपणा चालणार नाही. सुदिन ढवळीकर तसेच दिगंबर कामत यांच्यावरही मुख्यमंत्र्यांनी जोरदार हल्ला चढवला खाणींची, आर्थिक व्यवस्थेची दिगंबर कामत यांनी वाट लावली अंतर्गत पर्यटनाबरोबरच आध्यात्मिक, साहसी पर्यटनाचा विस्तार करू
'जी' म्हणजे सुशासन (गव्हर्नन्स), 'ओ' म्हणजे संधी (अपॉर्च्युनिटी), 'ए' म्हणजे महत्त्वाकांक्षा (अॅस्पिरेशन्स) अशी गोवा या शब्दाची इंग्रजी आद्याक्षरांच्या आधारे नवी व्याख्या पंतप्रधान मोदी यांनी सांगितली.