मडगाव ; पुढारी वृत्तसेवा : निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपुष्टात यायला दोन दिवस शिल्लक असल्याने विविध पक्षांकडून शुक्रवारी ११ रोजी बैठकांचा धडाका लावण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, काँग्रेस नेते राहुल गांधी दक्षिण गोव्यात विविध सभांना संबोधित करणार असून स्थानिक उमेदवारांनीही शेवटच्या क्षणी रॅली आणि सभांच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याचे ठरविल्याने शुक्रवारचा दिवस लक्षवेधी ठरणार आहे. (Rahul Gandhi)
दक्षिण गोव्यात गेल्या तीन महिन्यांपासून प्रचाराला रंग चढला होता. आचारसंहिता लागू झाल्याने निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करत उमेदवारांनी पाच कार्यकर्त्यांना घेऊन घरोघरी प्रचार केला होता. कोविडच्या नियमामुळे जाहीर सभा घेण्यावर उमेदवारावर निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी राजकीय पक्ष आणि उमेदवाराना शक्तीप्रदर्शन करता आले नाही.
निवडणूक तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे, बहुतांश उमेदवारांनी घरोघरी फिरून प्रचाराची शेवटची फेरी पूर्ण केली आहे. बुधवार आणि गुरुवारी उमेदवारांनी कोपरा बैठकांवर आपले लक्ष केंद्रित केले होते. गुरुवारी बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीवर भर देण्यात आला. शुक्रवार व शनिवारी असे दोनच दिवस प्रचारासाठी मिळत असल्याने सर्वांनी रॅली आणि जाहीर सभांतून शक्ती प्रदर्शन करण्याचे ठरविले आहे.
राहुल गांधी शुक्रवारी दक्षिण गोव्यात दाखल होणार आहेत. कुडचडे येथे 4 वाजता आणि कुडतरी येथे सायंकाळी 5 वाजता लोकांशी एकत्रितपणे संवाद साधतील.कुडचडेत उमेदवार अमित पाटकर यांच्या रॅलीला राहुल गांधी संबोधित करणार आहेत. भाजपचे कुडचडेचे उमेदवार निलेश काब्राल यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन रॅलीचे आयोजन केले आहे. सायंकाळी 4 वाजता त्यांची जाहीर सभा कुडचडेत होणार आहे.
भाजप उमेदवार सुभाष फळदेसाई यांची जाहीर सभा सांगेत होणार असून या सभेत स्मृती इराणी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. 12 रोजी फळदेसाई यांची आणखी एक सभा नेत्रावळीत होणार असून या सभेला महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
कुंकळ्ळीत मड्डीकट्टो येथे युरी आलेमाव सभा घेणार आहेत. मडगाव येथे भाजपचे उमेदवार बाबू आजगावकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जनतेला मार्गदर्शन करणार आहेत. शुक्रवारी नावेली येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. नावेली आप उमेदवार प्रतिमा कुतिन्हो यांच्या समर्थनार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे.