

भोपाळ; पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ (Shocking Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथील एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळाली नाही. यामुळे दोन मुलांना आईचा मतदेह मोटरसायकलला बांधून ८० किलोमीटर लांब असलेल्या आपल्या गावी न्यावा लागला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशातील आरोग्य व्यवस्थेवर सवाल उपस्थित केले जात आहेत.
शहडोलला लागून असलेल्या अनूपपूर जिल्ह्यातील गोंडारु गावात राहणाऱ्या जयमंत्री देवी यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्यावर सुरुवातीला शहडोल जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी शनिवारी रात्री ८० किलोमीटर दूर असलेल्या बिरसा मुंडा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. तेथे रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुपारनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पण मतदेह नेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाकडून शववाहिका देण्यात आली. खासगी वाहनाने मृतदेह गावी नेण्यासाठी पैसे नसल्याने मृत महिलेच्या मुलांनी मृतदेह लाकडी स्लॅबला बांधून मोटरसायकलवरुन नेला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.
इस्पितळ प्रशासनाने आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झाल्याचे मान्य केलेले नाही. त्यांनी दावा केला की महिलेच्या कुटुंबियांनी शववाहिका देण्याबाबत विचारणा केली नाही. याबाबत शहडोलच्या जिल्हाधिकारी वंदना वैद्य म्हणाल्या, ही बाब आमच्या निदर्शनास येताच सविस्तर तपास करण्यात आला. जिल्हाातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे दोन शववाहिका आहेत आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडेदेखील काही शववाहिका आहेत. ही सेवा मोफत दिली जाते. जिल्हा रुग्णालयात अशा व्हॅन पुरवणाऱ्यांचे संपर्क क्रमांक डिस्प्ले करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वॉर्ड बॉय आणि परिचारिकांना महिलेच्या मुलांनी त्यांच्याकडे वाहन असल्याचे सांगितले. त्यांच्या विनंतीवरून मृतदेह स्ट्रेचरवर बाहेर आणण्यात आला. ही घटना वैद्यकीय महाविद्यालयाबाहेर घडली, असे वैद्य यांनी सांगितले.
या घटनेचा व्हिडिओ (Shocking Video) शेअर करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी म्हटले आहे की, मध्य प्रदेशातील भाजप सरकारच्या १८ वर्षांच्या विकासाचे हे लाजिरवाणे चित्र आहे… ही राज्याची आरोग्य यंत्रणा आहे. शहडोल येथील महिलेच्या मृत्यूनंतर शववाहिका न मिळाल्याने मुलाने आईचा मृतदेह मोटरसायकलला बांधून ८० किमी अंतरावरील गावात नेला.
तीन आठवड्यांतील ही तिसरी घटना आहे. १० जुलै रोजी एका आठ वर्षांच्या मुलाचा रस्त्याच्या कडेला बसलेला एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला होता. तो त्याच्या मृत लहान भावाला पाळण्यात घालून झोके देतात तसे झोके देत होता. कारण त्याचे वडील मुलाचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी शववाहिका अथवा रुग्णवाहिका मिळवण्यासाठी धावपळ करत होते. २८ जुलै रोजी इंदूरमध्ये एका कुटुंबाला एका मृत नातेवाईकाला खाटेवर घेऊन जावे लागले. कारण जिल्हा रुग्णालयातील मुख्य रस्त्यावर खड्डा पडला होता.