

पुढारी ऑनलाईन डेस्क
बिहारमधील एका लग्न मंडपातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील हारीबारी गावात एका लग्न सोहळ्यात बाल्कनी कोसळून २४ हून अधिक जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री ही घटना घडली. लोक वधूच्या घराच्या बाल्कनीतून जयमाला सोहळा (वरमाला) पाहत होते, त्यावेळी बाल्कनी अचानक कोसळली. यामुळे मोठ्या संख्येने वर्हाडी मंडळी जखमी झाले. त्यांना गावकऱ्य़ांनी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या घटनेतून वधू-वर थोडक्यात बचावले आहेत.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, घराची बाल्कनी खूप जुनी होती. त्यावर वर्हाडी मंडळी उभे राहून जयमाला सोहळा पहात होती. पण बाल्कनी कोसळल्याने त्यावरील लोकं धाडकन खाली पडली. यामुळे लग्न मंडपात एकच गोंधळ निर्माण झाला. नेमकं काय झालं हे कुणाला काहीच कळेना. याचदरम्यान लग्न मंडपात एक व्यक्ती व्हिडिओ शुटिंग करत होता. त्याच्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.
फेसर ठाणे क्षेत्रातील देवरिया गावातून सोमवारी रात्री हारीबारी गावात वर्हाडी मंडळी आली होती. त्यानंतर जयमाला सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांनी आणि तरुणींनी वधूच्या घराच्या बाल्कनीत गर्दी केली होती. कमी जागेत गर्दी झाल्याने बाल्कनीवर भार पडला आणि ती कोसळली. या घटनेत २४ हून लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिलांचा अधिक समावेश आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.