सकाळपासनं म्हसरं वरडायल्यात, रानात जायला चिखूल लै झालाय, दोन बिंड वैरण पाठवून द्या…ऑडिओ क्लिप व्हायरल | पुढारी

सकाळपासनं म्हसरं वरडायल्यात, रानात जायला चिखूल लै झालाय, दोन बिंड वैरण पाठवून द्या...ऑडिओ क्लिप व्हायरल

हुपरी, (काेल्हापूर) अमजद नदाफ : ”पाच दिवस धो धो पाऊस पडतोय …शेतात चिखल झालाय. जनावर चारा नाही म्हणून ओरडत अहेत…तुम्ही दोन बिंड चारा तात्काळ पाठवा,” असा फोन करून सांगोल्यातील (जि. सोलापूर) एका शेतकऱ्याने अॅमेझॉनच्या प्रतिनिधींना ऑर्डर दिली आहे. त्यामुळे ॲमेझॉनचे ग्राहक प्रतिनिधी देखील गोंधळले. ही क्लिप वायरल झाल्याने तो एक चर्चेचा विषय बनला आहे तसेच लोकांची हसून हसून पुरेवाट होत आहे.

सध्या सर्वत्र ऑनलाईन खरेदी करण्याचा ट्रेंड आला आहे. त्यातल्या त्यात ॲमेझॉनसारखी कंपनी गोव-या सुद्धा विकते. त्यामुळे चारादेखील ऑनलाइन मिळेल अशा अपेक्षेने एका शेतक-याने ॲमेझॉनच्या ग्राहक प्रतिनिधींना कॉल करून दोन बिंडे चा-याची ऑर्डर दिली.

गेली काही दिवस सतत पाऊस सुरू आहे. शेतात पाय ठेवण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे चाऱ्याविना जनावरांचे हाल होत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्याने शक्कल लढवून ॲमेझॉनला फोन करून जनावरं चाऱ्याविना हंबरडा फोडत अहेत. एक दोन बिंडे चारा पाठवा, अशी विनंती केली.

त्यामुळे ॲमेझॉनचे ग्राहक प्रतिनिधीही काही वेळासाठी गोंधळले. ॲमेझॉनने त्यांना उत्तर दिले, चारा मिळेल पण त्याला पाच सहा दिवस लागतील. त्यावर चार-पाच दिवस जनावरं उपाशी राहतील काय? असा प्रश्न त्या शेतक-याने केला. तसेच सगळ्या वस्तू दुस-या दिवशी मिळतात पण चा-याला 5-6 दिवस का लागतील शेतक-याच्या या प्रश्नाने नेमके काय उत्तर द्यावे हे प्रतिनिधींना देखील कळत नव्हते.

शेवटी तुम्ही चार्टमध्ये चारा मिळतो काय बघा, आणि ॲपवर ऑर्डर द्या, असे म्हणत हा संवाद संपतो. शेवटी जाता जाता त्या शेतकऱ्याने एकदमच ऑर्डर देतो म्हणजे रोज एक बिन्डा येइल, असे म्हटले. हा संवाद व्हायरल झाला असून लोकांची हसून हसून पुरेवाट होत आहे.

हे ही वाचा:

Back to top button