सद्विवेकी जगण्याच्या विचारांचा लढा | पुढारी

सद्विवेकी जगण्याच्या विचारांचा लढा

माणसाच्या मनातील विकार दूर व्हावेत आणि सर्जनशील विचारांचा माणूस घडावा, सकारात्मक विचारांतून समाजमन सुद़ृढ व्हावे, हा मूळ गाभा पकडून गेली 77 वर्षे वैचारिक लढा पुढे नेणारी श्री समर्थ बैठक आज जगभर विस्तारली आहे. या बैठकीचे गेल्या 50 वर्षांतील आधारस्तंभ पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारने महाराष्ट्रभूषण पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा या छोट्याशा गावात सुरू झालेला हा परिवर्तनाचा लढा आज जगभर विस्तारला. श्री समर्थ बैठक संकटमोचक म्हणून कठीण प्रसंगात लोकांना आधार देणारी चळवळ ठरली. यातून माणसांची मने जोडण्याचे काम वर्षानुवर्षे होत राहिले, म्हणूनच हा लढा आज व्यापक स्वरूपात आपल्यासमोर आला आहे, त्याला केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ देऊन यापूर्वीच पावती दिली आणि आता ‘महाराष्ट्रभूषण’ देऊन महाराष्ट्र शासनाने या विचारांचा गौरव केला आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी ते आप्पासाहेब धर्माधिकारी हा 77 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास आहे. आता हीच धुरा डॉ. सचिन धर्माधिकारी पुढे नेत आहेत. 8 ऑक्टोबर 1943 या दिवशी 7 श्री सदस्यांच्या सहभागातून सुरू झालेला हा प्रवास 7 कोटी श्री सदस्यांपर्यंत विस्तारला आहे. लोकांच्या मनात चैतन्य निर्माण करणारे विचार देण्याचे काम ‘निरूपणकार’ डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केले. हाच विचार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी तेवढ्याच समर्थपणे पुढे नेत त्याला व्यापक रूप दिले. ‘शहाणे करून सोडावे सकळ जन’ या संत उक्तीप्रमाणे चाललेले हे काम सर्जनशील समाज घडविण्यासाठी प्रेरक ठरत आहे. ‘देह वेचावा कारणी’ हा विचार घेऊन शब्दांच्या सामर्थ्यावर मानवी मनाचा ठाव घेण्याचे काम ही चळवळ करत आहे. ‘शब्दांनू मागुते’ या असे म्हणत साहित्यातील सारस्वतांनी विद्येचा जागर उभा केला, यातून महाराष्ट्राला दिशा मिळाली. संतांच्या विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण झाली, एक भक्तीचा महिमा फुलला. हाच धागा पकडून श्री समर्थ बैठकीत माणसांच्या मनात नवज्योत तेवत ठेवली गेली. स्वच्छतेचा संदेश, पाणी वाचवा, पाणी जिरवाचा संदेश, व्यसनमुक्तीचा संदेश, झाडे लावा, झाडे जगवाचा संदेश देत सामाजिक अस्वास्थ्यावर स्वास्थ्यशील विचारांचा नवा आधार यातून पुढे आला. जो विचार आचार देतो त्यातूनच सुंसस्कृत समाज घडतो. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जीवनप्रवास याच विचारदिशेतून पुढे गेलेला आहे. ‘महाराष्ट्रभूषण’ त्यांना दिल्यामुळे या विचारांचा गौरव झाला आहे.

‘ज्ञानेश्वरे रचिला पाया, तुका झालासे कळस…’ असा विस्तारलेला वारकरी संप्रदाय अखंड महाराष्ट्राची प्रेरणा झाला, त्याच पद्धतीने श्री समर्थ बैठकीची चळवळ ही चेतना आणि शक्तीचे अखंड स्मरण, चिंतन करून देणारी, माणूस घडविणारी चळवळ झाली आहे. माणसात देव शोधण्याची विचारांची दिशा संत वाङ्मयाने दिली. तोच विचार श्री समर्थ बैठकीत आहे. तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी अखंड भारत भ—मण करून माणसाच्या अस्वास्थ्यपणाची जी कारणे शोधली त्यातूनच श्री समर्थ बैठकीचा जन्म झाला.

संबंधित बातम्या

माणसा-माणसांत निर्माण होणारी तेढ, द्वेष भावना समाज बिघडवू पाहतात, तेथे सर्जनशील समाज घडविणार्‍या चळवळीची गरज भासते. नेमकी नवी ताकद श्री समर्थ बैठकीने समाजाला दिली. या चळवळीतील विचारांचा आज वटवृक्ष झाला आहे. ‘देवत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती’ असे आपण नेहमीच म्हणत असतो, रूढ अर्थाने देवत्वाची संकल्पना आपण देवळाच्या भोवती सीमित करतो; मात्र एखादा युगपुरुष देवासमोर हात जोडतो तेव्हा त्याच्यासमोर येते ते देवत्व. देवाशिवाय देवत्व आहे का? असा प्रश्न जेव्हा मनात येतो, तेव्हा प्रत्येक माणसात दडलेला देव शोधण्याची प्रक्रिया सुरू होते, माणसामधले सद्विचार पुढे येणे यालाच देवत्व मानून श्री समर्थ चळवळीने समाजामध्ये निर्मळ विचार देण्याचे काम केले आहे. वारकरी दिंडीमध्ये हजारो किलोमीटर चालणारी माणसे ध्येयाने प्रेरित होऊन पुढे जातात आणि विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात, तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर अवर्णनीय असा आनंद पाहायला मिळतो, हेच वारकरी संप्रदायाच्या यशाचे गमक राहिले आहे. पंढरीचा राजा पाहण्याऐवजी भक्तांच्या हृदयात फुलवलेला भक्तीचा, सद्विचारांचा मळा फुलविण्यात आनंद देणारे विचार वारकरी संप्रदायात मिळतात आणि याच विचारांची दिशा श्री समर्थ बैठकीतही पाहायला मिळते.

– शशिकांत सावंत

Back to top button