ही काँग्रेस कोणाची? | पुढारी

ही काँग्रेस कोणाची?

नानांच्या काँग्रेसचे काम करायचे की, बाळासाहेबांच्या काँग्रेसचे, हा नाशिकमध्ये काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांना एका कार्यकर्त्याने विचारलेला प्रश्न संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांसाठी प्रातिनिधिक म्हणावा लागेल. त्या पक्षात सध्या उडालेला गोंधळ या एका प्रश्नातून स्पष्ट होतो.

काँग्रेस नेते नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांच्यात प्रदेश पातळीवर उडालेल्या चकमकीनंतर नाशिकमध्ये त्याची प्रतिक्रिया काहीशा गमतीदार पद्धतीने उमटली. प्रदेश प्रवक्त्या व माजी नगरसेविका हेमलता पाटील याच्या केंद्रस्थानी राहिल्या. काँग्रेस दिवसेंदिवस गलितगात्र होत असताना आणि तिच्या या प्रकृतीत सुधारणा होण्याची सुतराम शक्यता दिसत नसताना जी काही मोजकी नेतेमंडळी पक्ष टिकवण्याची धडपड करताहेत, त्यात पाटील यांचे नाव ठळकपणे पुढे येते. विविध वृत्त वाहिन्यांवर पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडताना सर्वांनी त्यांना पाहिले आहे; मात्र या पाटील यांच्यावरच एका कार्यकर्त्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कपाळाला हात लावण्याची वेळ आली. या कार्यकर्त्याने त्यांना, ‘ताई, आपण कोणाच्या काँग्रेसचे काम करायचे, नानांच्या की बाळासाहेबांच्या?,’ असा प्रश्न केला असता पाटील हतबल झाल्या आणि त्यांनी त्यांच्या भावना, ‘आता काय उत्तर देऊ, कप्पाळ!’ अशा शब्दांत व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, त्यांनी स्वत:च हा किस्सा ट्विट केला. कार्यकर्त्याने तो प्रश्न भाबडेपणाने विचारला की खोचकपणे, ते कळायला मार्ग नाही; पण नाशिककरांचे यामुळे चांगलेच मनोरंजन झाले आणि राजकीय वर्तुळात तर काँग्रेसच्या भवितव्याचीच चर्चा सुरू झाली.

सध्या काँग्रेसमध्ये प्रदेश स्तरावर सुरू असलेली सुंदोपसुंदी पाहता त्या कोणा एका कार्यकर्त्याचा प्रश्न प्रातिनिधिक म्हणण्यासारखाच. पटोले-थोरातच नव्हे तर अन्य नेत्यांमध्येही फारशी एकवाक्यता दिसत नसल्याने कार्यकर्त्यांना असा प्रश्न विचारावा लागणे पक्षाची सद्यस्थिती स्पष्ट करणारे आहे. खरे तर, राज्यातील बड्या नेत्यांना पक्षाची अजिबात काळजी वाटत नसताना आणि ते वैयक्तिक मानापमानातच अडकून पडलेले असताना कार्यकर्ते कोणत्याही भावनेने का असेना; पण असा प्रश्न विचारतात हेच कौतुकास्पद मानावे लागेल. भविष्यात काँग्रेस टिकेल ती अशा कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर आणि बळावरच, हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज भासू नये.
असे हे कार्यकर्तेही आता दुर्मीळ होऊ लागले आहेत. त्याला काही प्रमाणात स्थानिक पातळीवरील संघटनेकडे वरिष्ठ नेत्यांचे झालेले दुर्लक्षही कारणीभूत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहराध्यक्षपदाचा तिढा सुटू शकलेला नाही.

शरद आहेर यांनी सहा-सात वर्षे प्रभारी शहराध्यक्ष म्हणून काम केले आणि सात-आठ महिन्यांपूर्वी त्यांनीही या पदाचा राजीनामा दिला आहे. ग्रामीण भागाची अवस्थाही काही वेगळी नाही. जिल्ह्यात सध्या इगतपुरीत हिरामण खोसकर यांच्या रूपाने काँग्रेसचा केवळ एक आमदार आहे. शेजारच्या जळगाव-धुळे-नंदुरबारमध्येही काँग्रेसची हीच गत आहे. काँग्रेसच्या द़ृष्टीने जळगावला वेगळे महत्त्व आहे. जिल्ह्यातील फैजपूर येथे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन 1936 मध्ये भरले होते. या अधिवेशनातच खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. 1990 नंतर मात्र जिल्हा काँग्रेसच्या हातातून सुटत गेला आणि पाहता पाहता भाजप-शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. सध्या रावेरचे शिरीष चौधरी वगळता पक्षाचा अन्य आमदार जिल्ह्यात नाही.

जळगाव महापालिकेत एकही नगरसेवक काँग्रेसचा नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून थेट दिल्लीश्वरांकडे ओळख असणार्‍या धुळे जिल्ह्यातही पक्षाची पुरती दैना झाल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या माध्यमातून स्वतःचे स्थान तयार करणारे मातब्बर नेते अमरीशभाई पटेल यांच्यासह अनेक नेते भाजपवासी झाले आहेत. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थांवरही भाजपचेच वर्चस्व आहे. धुळे ग्रामीणमध्ये आमदार कुणाल पाटील यांनी किल्ला एकहाती लढवण्याचे काम सुरू ठेवले आहे. नंदुरबारमध्ये अक्कलकुव्यात के. सी. पाडवी आणि नवापूरला शिरीष नाईक असे दोन आमदार आहेत. तेथील सर्वांत बुजुर्ग नेत्याला तर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची नावेही सांगता येत नाहीत. आता अशी ही सगळी स्थिती असताना उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसबद्दल काय बोलणार..? कप्पाळ..!

  • प्रताप म. जाधव

Back to top button