शिवसेना नेते, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मागे ईडी? | पुढारी

शिवसेना नेते, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मागे ईडी?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सिटी को-ऑप बँकेत झालेल्या सुमारे 900 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या आठवड्यात याप्रकरणाशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी केली होती.

या कारवाईमध्ये ईडीने काही कागदपत्रांसह महत्त्वपूर्ण दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत. त्याआधारे ईडी अडसूळांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावण्याची शक्यता आहे.

सिटी को-ऑपरेटीव्ह बँकेचे अडसूळ अध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या नातेवाइकांना संचालक मंडळावर घेतले होते. या बँकेची उलाढाल सुमारे एक हजार कोटींच्या आसपास होती. कर्जवाटपात अनियमितता आणि एन.पी. ए.मध्ये झालेल्या घसरणीमुळे बँक डबघाईला आली आणि अखेर बुडीत निघाली. बँकेचे काही हजार सदस्य होते. अनेक पेन्शनर खातेदार होते.

खातेदार आणि ठेवीदारांनी अनेकदा अडसूळ यांना भेटून काही तरी मार्ग काढण्याची विनंती केली. मात्र काहीच तोडगा न निघाल्यामुळे अखेर खातेदारांनी पोलिसांत तक्रार केली.

मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. याच अनुषंगाने ईडीने अडसूळ यांना चौकशीसाठी बोलवून त्यांची सुमारे तीन तास चौकशी केली. त्यानंतर आता ईडीने पुन्हा एकदा याप्रकरणाशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान यासंदर्भात आनंदराव अडसूळ यांच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची या प्रकरणातील प्रतिक्रिया समजू शकली नाही.

Back to top button