हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यातूनच आंबेओहोळची पूर्तता | पुढारी

हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यातूनच आंबेओहोळची पूर्तता

गडहिंग्लज ; पुढारी वृत्तसेवा : एखाद्या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी किती पाठपुरावा करावा म्हणजे यश मिळते, याचे मूर्तिमंत उदाहरण आंबेओहोळ प्रकल्प आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाले. त्यांच्या पाठपुराव्याशिवाय हा प्रकल्प पूर्णच झाला नसता, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. उत्तूर (ता. आजरा) येथील आंबेओहोळ मध्यम प्रकल्पाचे लोकार्पण व पाणीपूजन कार्यक्रम गुरुवारी पार पडले.
यावेळी मंत्री पाटील बोलत होते.

अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी स्वागत केले. यावेळी प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी सहकार्य केलेल्या सर्व मान्यवर तसेच अधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. प्रकल्पाचे कंत्राटदार संजय पाटील यांचा जलसंपदा खात्यामार्फत सत्कार करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांकडून मंत्री मुश्रीफ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पूर्ण क्षमतेने पाणी अडवलेला हा पहिलाच प्रकल्प

मंत्री पाटील म्हणाले, कुपेकरांनी या प्रकल्पाचा पाया घातला तर हसन मुश्रीफ यांनी प्रकल्प पूर्ण करून या पायावर कळस चढविण्याचे काम केले आहे. भाजपच्या सत्तेच्या कार्यकालात तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांकडे हसन मुश्रीफ अनेकदा जाऊन बसले. मात्र त्यावेळी अडचणी आल्या. माझ्याकडे जलसंपदा खाते आल्यावर मात्र मुश्रीफांनी मला स्वस्थ बसू दिले नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात गेल्या सात वर्षांतील पूर्ण क्षमतेने पाणी अडवलेला हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे.

प्रकल्पासाठी त्यांची असलेली धडपड पाहून माझ्या खात्यानेही यासाठी पुढाकार घेत हे काम तडीस नेले. लाभक्षेत्रासह बुडित क्षेत्रातील लोकांना पाण्यासाठी तातडीने परवाने देणार असून पुनर्वसनासाठी सध्या सुरू असलेल्या कामाचा वेग अजिबात कमी करू नका, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, शेवटच्या धरणग्रस्ताचे पुनर्वसन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सात वर्षांत पाणी अडवलेला हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प ठरल्याने त्याचा सार्थ अभिमान आहे. या भागातील माय-भगिनी डोक्यावरून पाणी आणत असल्याचे विदारक चित्र होते. आता मात्र या भगिनींना डोक्यावर घागर घ्यावी लागणार नाही, याचे समाधान आहे.

यावेळी भाजपकडून प्रकल्प पूर्ततेच्या केलेल्या जाहिरातबाजीवर ना. मुश्रीफ यांनी टीका केली. ते म्हणाले, ज्यांनी प्रकल्प पूर्ततेचे बोर्ड लावले तेच लोक घळभरणी होऊ नये, यासाठी उच्च न्यायालयात गेले होते. भाजपच्या पाच वर्षांच्या कालावधीत या ठिकाणी पाणी का अडविले नाही? संपूर्ण जिल्ह्यात पाणी अडविणे दूरच, त्यांनी जिल्ह्याचेच वाटोळे केले.

निडसोशी मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामी म्हणाले, या प्रकल्पाचा पाया स्व. बाबासाहेब कुपेकरांनी घातला. मुश्रीफांनी अथक प्रयत्नातून यावर कळस चढविण्याचे काम केले आहे. खा. मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास आ. राजेश पाटील, आ. प्रकाश आबिटकर, माजी आ. संध्यादेवी कुपेकर, माजी आ. संजय घाटगे, जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांच्यासह प्रशासकीय अधिकारी तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांसह लाभक्षेत्रातील महिला तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण

कोल्हापूर जिल्ह्यातील नागणवाडी व शाहूवाडीचा प्रकल्प 2022 मध्ये, सर्फनाला व उचंगी हे प्रकल्प 2023 मध्ये तर धामणी प्रकल्प 2024 मध्ये पूर्ण करण्याचे ध्येय असल्याचेही ना. पाटील यांनी स्पष्ट केले.

महिलांनी आणल्या दुरड्या

गेली अनेक वर्षे या भागात पाणी नसल्याने त्याचा सर्वाधिक त्रास हा महिला-भगिनींना होत होता. आज हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्याने महिला-भगिनींचा त्रास संपुष्टात आला. त्यामुळे माहेरवाशिणीच्या भेटीप्रमाणे महिलांनी गोडधोड पदार्थांच्या दुरड्या आणून आपला आनंद व्यक्त केला.

Back to top button