निवडणूक एक, समस्या अनेक..! | पुढारी

निवडणूक एक, समस्या अनेक..!

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आता निर्णायक वळणावर आली आहे. गेल्या आठवड्यात बर्‍याच उलथापालथी झाल्यानंतर अखेर अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार शशी थरूर हे दोनच नेते उरले आहेत. गांधी कुटुंबीयांची पहिली पसंती असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना राजस्थानचा मोह सोडविला नाही आणि बरीच ‘ड्रामेबाजी’ झाल्यानंतर ते स्पर्धेतून बाहेर पडले. त्यानंतर युद्धपातळीवर गांधी कुटुंबीय समर्थकांकडून नव्या उमेदवाराचा शोध घेण्यात आला आणि हा शोध खर्गे यांच्या नावावर येऊन थांबला.

येत्या 17 ऑक्टोबरला होणार्‍या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गे यांचा विजय ही औपचारिकता असली तरी या निवडणुकीमुळे अनेक प्रश्न आणि समस्या निर्माण होणार आहेत, हेही नाकारता येत नाही. मागील काही वर्षांपासून घसरणीला लागलेल्या काँग्रेस पक्षाला धडाडीच्या नेतृत्वाची गरज होती. त्यातच असंतुष्ट नेत्यांच्या गटाने नेतृत्वबदलाची मागणी लावून धरल्याने अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याशिवाय सोनिया गांधी यांच्यासमोर पर्याय राहिला नव्हता. राहुल गांधी यांनी निवडणूक लढविण्यास ठामपणे नकार दिल्याने गांधी कुटुंबाबाहेरचा उमेदवार यावेळी अध्यक्ष बनणार, हे जवळपास निश्चित होते; पण गांधी कुटुंबीय कोणाच्या बाजूने कौल देणार, याबद्दल मात्र कुतूहल निर्माण झाले होते. गेहलोत यांच्या नावावर गांधी कुटुंबाचे समर्थक येऊन थांबले होते. मात्र, या समर्थकांना ठेंगा दाखविण्यात गेहलोत यांना यश आले आहे.

गेल्या आठवड्यात ज्या काही घडामोडी घडल्या, त्यावरून गेहलोत यांना राजस्थानचा मोह सोडवला गेला नाही, हेच स्पष्ट झाले. एकावेळी राजस्थानचे मुख्यमंत्रिपद आणि काँग्रेसचे अध्यक्षपद ही दोन्ही पदे सांभाळू, अशी ऑफर गेहलोत यांनी गांधी कुटुंबीयांना दिली होती. तथापि, राहुल गांधी यांनी ही ऑफर सपशेल धुडकावून लावली. त्यानंतर आपल्या मर्जीतल्या नेत्याला राजस्थानचे मुख्यमंत्री करावे, असा आग्रह गेहलोत यांनी धरला. तिकडे सचिन पायलट यांच्या नावाचा विचार करीत असलेल्या गांधी कुटुंबीयांनी इतर नावांचा विचार करण्यास नकार दिला आणि इथेच सारे फिसकटले. राजस्थान विधानसभेत गेहलोत समर्थक आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या आमदारांनी थेट केंद्रीय नेतृत्वाला आव्हान दिले आणि गेहलोत यांनी देखील ‘स्थिती माझ्या नियंत्रणात नाही’ असे सांगून हात वर गेले. याची परिणती गेहलोत यांची अध्यक्षपदाची उमेदवारी जाण्यात झाली; पण ते गांधी कुटुंबीयांच्या ‘बॅड बुक’मध्ये जाऊन बसले
आहेत.

अध्यक्षपद निवडणुकीच्या काळात घडलेल्या वरील घडामोडींचे पडसाद आगामी काळात राजस्थान काँग्रेसमध्ये निश्चितपणे उमटणार आहेत. तूर्तास आगीत तेल नको म्हणून पक्षनेतृत्वाने गेहलोत यांना अभय दिले आहे; पण पुढील काळात पक्ष नेतृत्वाला आव्हान दिल्याच्या प्रकाराचे उत्तर त्यांना द्यावे लागल्यास आश्चर्य वाटू नये. राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत, अशा स्थितीत सचिन पायलट गट कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष राहील. हातात आलेले मुख्यमंत्रिपद गहलोत यांच्यामुळे गेल्याची सल पायलट गटाच्या मनात सदैव राहील. राजस्थान काँग्रेसमधील या दुफळीचा फायदा उठविण्याचा भाजप कसोशीचा प्रयत्न करेल.

जनाधार नसलेले नेते…..

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे दोन नेते उरले आहेत, त्यांना फारसा जनाधार नाही. खर्गे हे कर्नाटकातून आलेले नेते आहेत. त्यांची अवघी हयात काँग्रेसमध्ये गेली आहे. गत लोकसभेत ते विरोधी पक्षनेते होते, तर दोन दिवसांआधीपर्यंत ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खर्गे गांधी कुटुंबाच्या प्रभाव आणि हस्तक्षेपाशिवाय काम करू शकतील काय, हा खरा प्रश्न आहे. शशी थरूर हे केरळमधील तिरुवअनंतपूरम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. संयुक्त राष्ट्रसंघात वरिष्ठ पदावर काम केल्यानंतर ते राजकारणात आले होते. फर्डे इंग्रजी बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले थरून हे अनेक वादांत अडकलेले व्यक्तिमत्त्व आहे. पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या घडवून आणल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर काही वर्षांआधी झाला होता. देशाचा चुकीचा नकाशा अनेकदा जनतेसमोर मांडण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी असा अक्षम्य प्रकार पुन्हा केला होता.

खर्गे यांच्या उमेदवारीच्या प्रस्तावावर गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय ए. के. अँटोनी, अंबिका सोनी तसेच असंतुष्ट गटाचे आनंद शर्मा व इतर नेत्यांच्या सह्या होत्या. दुसरीकडे थरूर यांच्या प्रस्तावावर फारशा ओळखीच्या नसलेल्या नेत्यांच्या सह्या होत्या. यातूनही गांधी कुटुंबाचा कल कुणाकडे झुकलेला आहे, हे दिसून आले आहे. खर्गे हे काँग्रेसमधले भीष्म पितामह आहेत; पण अध्यक्षपदाची निवडणूक पक्षपाताशिवाय व्हावी, असे थरूर यांनी सांगितले आहे. यातून देखील बरेच संकेत मिळतात. काँग्रेसला तारण्यासाठी युवा नेत्याला संधी मिळणे, बदल होणे आवश्यक असल्याचा थरूर यांचा युक्तिवाद आहे. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 8 ऑक्टोबर हा आहे. शशी थरूर हे अर्ज मागे घेणार काय, याकडे सर्वांचे लक्ष राहील.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गे यांनी विजय मिळवला तर 1998 नंतरचे ते गांधी कुटुंबाबाहेरचे पहिले अध्यक्ष ठरतील. डिसेंबर 2017 ते मे 2019 हा राहुल गांधी यांचा कार्यकाळ वगळला तर गेल्या 24 वर्षांत काँग्रेसचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडेच राहिलेले आहे. सोनिया गांधी यांची सक्रियता आजारपण व अन्य कारणाने कमी झालेली आहे. दुसरीकडे राहुल आणि प्रियांका गांधी-वधेरा यांना राजकारणात अद्याप फारसे यश आलेले नाही. त्यामुळे पुढील काळात बरीचशी मदार नव्या अध्यक्षावर राहणार आहे. अध्यक्ष कुणीही बनला तरी गांधी कुटुंबाच्या सावलीबाहेर पडून त्याला काम करणे महामुश्किलीचे ठरणार आहे, यात काही शंका नाही. थोडक्यात, काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक एक आणि समस्या अनेक, असेच सध्याचे चित्र आहे.

– श्रीराम जोशी

Back to top button