विदेशी वृक्षांचा ‘ताप’ | पुढारी

विदेशी वृक्षांचा ‘ताप’

भारतात विदेशी वृक्षांची संख्या वाढल्यामुळे स्थानिक पातळीवर तापमानवाढ होत असल्याचा दावा काही अभ्यासकांनी केला आहे. हा दावा पूर्णतः चुकीचा आणि अशास्त्रीय आहे. मात्र, विदेशी वृक्षांच्या काही प्रजातींचे अन्य तोटे दुर्लक्षित करता येणार नाहीत. अलीकडेच काही अभ्यासकांनी विदेशी वृक्षांमुळे तापमान वाढत असल्याचा दावा केला आहे. भारतात विदेशी वृक्षांची लागवड होत असल्यामुळे तापमान वाढ होत आहे, असा या अभ्यासकांचा जावईशोध आहे.

तथापि, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. मुळात बहुतांश देशी आणि विदेशी पर्णझडी वृक्षांमध्ये हिवाळ्याच्या अखेरीस व प्रामुख्याने उन्हाळ्यात पानगळ होते. पानगळीच्या कालावधीत तापमानवाढ होते. मग ती विदेशी वृक्षांमुळे होते असे म्हणणे चुकीचे आहे. तापमानवाढ ही हरितगृह वायूंच्या अमर्याद वाढीमुळे होत आहे. वृक्षांमुळे तापमान कमी होण्यास मदतच होत असते; मग ते वृक्ष देशी असोत किंवा विदेशी! या अभ्यासकांनी आपला दावा मांडताना विदेशी वृक्षांच्या भारतात असणार्‍या जातींची संख्या 18 हजार असल्याचे म्हटले आहे; परंतु ते साफ चुकीचे आहे.

कारण देशात एकूण वनस्पतींच्या 50 हजार जाती आहेत. यामध्ये रोप, वेल, झुडूप व वृक्षवर्गीय सर्व वनस्पतींचा समावेश आहे. अशी वस्तुस्थिती असताना फक्‍त वृक्षांच्या 18 हजार जाती आहेत, असे म्हणणे अयोग्य आहे. आजमितीला भारतात सुमारे 3000 ते 3100 वृक्षांच्या जाती आहेत. यापैकी 1200 ते 1250 जाती विदेशी वृक्षांच्या आहेत. महाराष्ट्रात वृक्षांच्या 752 जाती असून, यापैकी 292 जाती विदेशी आहेत. यामध्ये निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, सुबाभूळ, सुरू, ग्लिरिसिडीया, सिल्व्हर ओक, मॅनजियम, विलायती शमी, कोनोकार्पस, महोगनी, लक्ष्मीतरू इत्यादी सुमारे 100 ते 110 जातींचे विदेशी वृक्ष अतिरेकी गुणधर्माचे असल्याने पर्यावरण व स्थानिक जैवविविधतेसाठी मारक व घातक आहेत.

संबंधित बातम्या

वनविभागाने देशभरात या सर्व वृक्षांची मोठ्या प्रमाणात आणि एकसुरी लागवड केली आहे. यामुळेच देशात विदेशी वृक्षांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बागांमध्ये आणि रस्त्याकडेने गुलमोहोर, रेन ट्री, पिचकारी, पितमोहोर, काशीद, सिंगापूर चेरी आदी अनेक अतिआक्रमक गुणधर्माच्या विदेशी वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. या सर्व विदेशी वृक्षांच्या जाती स्थानिक पर्यावरणासाठी आणि जैवविविधतेसाठी घातक आहेत. अर्थात, सर्व विदेशी वृक्ष घातक नाहीत आणि त्यांच्यामुळे तापमानवाढ होते असेही नाही. त्यामुळे विदेशी वृक्षांमुळे तापमानवाढ होते, यावर कोणीही विश्‍वास ठेवू नये.

देशात सुमारे 50 हजार वनस्पतींच्या प्रजाती असून, यापैकी 40 टक्के प्रजाती विदेशी आहेत. देशात 20 हजारांच्या आसपास विदेशी वनस्पतींच्या प्रजाती आढळून आल्या असून, यातील बहुतांश प्रजाती तणवर्गीय आहेत. 25 टक्के प्रजाती अतिआक्रमक गुणधर्माच्या आहेत. तणवर्गीय वनस्पतींबरोबर विदेशी वृक्षही अतिआक्रमक गुणांचे आहेत. या आक्रमक तणामुळे भारतात दरवर्षी शेती उत्पादनात 30 टक्के घट होते. घाणेरी किंवा टणटणी हे झुडूपवर्गीय विदेशी तण मूळचे मध्य आणि दक्षिण अमेरिका खंडातील असून, 1820 च्या दरम्यान ब्रिटिश राजवटीत इंग्रज अधिकार्‍यांनी ही शोभेची वनस्पती म्हणून बागेत लागवड करण्यासाठी भारतात आणल्याची रितसर नोंद आढळते; पण नंतर या शोभिवंत वनस्पतीचा तण म्हणून भारतभर प्रसार झाला.

आज देशात 13 दशलक्ष हेक्टर जमिनीवर आणि वनक्षेत्रात घाणेरी पसरलेली आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात हे तण फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर केंदाळ, काँग्रेस म्हणजेच गाजरगवत, रानमोडी, ओसाडी या तणांनीही मोठा भूभाग व्यापला आहे. कॉसमॉस, झिनिया, वेडेलिया, विदेशी आघाडा अशा अनेक विदेशी शोभिवंत वनस्पतीही तण म्हणून भारतात सर्वत्र पसरल्या आहेत. परिणामी आपल्या पाळीव तसेच जंगली जनावरांच्या चराऊ जागा कमी होऊ लागल्या. यामुळे शोभिवंत विदेशी वनस्पतींचा प्रचार-प्रसार आणि लागवड करताना योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

सुरुवातीला नमूद केल्यानुसार, वन विभागाकडून देशात लागवड केले जाणारे निलगिरी (ऑस्ट्रेलिया), ऑस्ट्रेलियन बाभूळ (ऑस्ट्रेलिया), ग्लिरिसिडिया (मेक्सिको), सुबाभूळ (मध्य अमेरिका), सुरू (ऑस्ट्रेलिया, दक्षिण पूर्व आशिया) हे सर्व वृक्ष विदेशी आहेत. निलगिरी वृक्षाच्या अनेक जाती आहेत. महाराष्ट्रातच निलगिरीच्या 13 जातींची लागवड केली आहे. आज भारतात सुमारे 10 लाख हेक्टरपेक्षाही अधिक भूक्षेत्रावर निलगिरीची लागवड आढळते. या वृक्षलागवडीचे तोटे लक्षात आल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने 2017 मध्ये निलगिरी वृक्षलागवडीवर त्या राज्यात बंदी घातली. अशी बंदी सर्व राज्यांत घालणे आवश्यक आहे. पूर्वी रस्त्यांच्या, महामार्गांच्या दोन्ही बाजूंना हमखास आढळणारे वड, पिंपळ, उंबर, चिंच, कडुनिंब यांसारखे देशी वृक्ष आज रस्ते विकास प्रकल्पांमुळे कायमचे नामशेष झाले आहेत.

वनिकरणासाठी लागवड केल्या जाणार्‍या सर्व विदेशी वृक्षांच्या रोपांची निर्मिती प्रामुख्याने वनविभागाच्या रोपवाटिकांमध्येच होते. निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ या वृक्षांखाली इतर रोपे व झुडूपवर्गीय वनस्पतीही वाढू शकत नाहीत. त्यामुळे स्थानिक परिसंस्थेवर परिणाम होऊन आपली स्थानिक जैवविविधताही नष्ट होऊ लागते. निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, सुरू यांसारख्या बहुतांश विदेशी वृक्षांची मुळे जमिनीत खोलवर शिरतात व पसरतात. ही मुळे मोठ्या प्रमाणावर पाणी शोषून घेतात. परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ लागते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपले पक्षी विदेशी वृक्षांवर आसरा घेत नाहीत आणि त्यावर आपले घरेटही बांधत नाहीत. त्यामुळे विदेशी वृक्षलागवडीचा स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या सहजीवनावर विपरीत परिणाम होतो.

शेवटी सर्व विदेशी वृक्ष हे धोकादायक अथवा नुकसानदायक नसल्याने सरसकट भूमिका घेणे चुकीचे ठरेल. रामफळ, सीताफळ यांसारख्या वनस्पतीही विदेशीच आहेत; पण त्यांची लागवड बंद करावी, असे कोणीच म्हणणार नाही. केवळ आक्रमक गुणधर्म असणारी झाडे आणि त्यांची एकसुरी लागवड बंद झाली पाहिजे. दुसरीकडे विदेशी वृक्षांबाबत केवळ तापमानवाढीबाबतच नव्हे तर अन्यही अफवा पसरवल्या जातात. ही झाडे कार्बन उत्सर्जन करतात, अशाही अफवांचे पीक आले होते. वस्तुतः ती माहिती धादांत खोटी होती. विदेशी वृक्षांबाबत इतका द्वेष करण्याची गरज नाही.

Back to top button