'पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकर्‍यांचे नुकसान' | पुढारी

'पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकर्‍यांचे नुकसान'

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; अवकाळी पावसाने केळी उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्य सरकारने पीक विमा योजनेच्या जुन्या निकषानुसार भरपाई द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ज्या शेतकर्‍यांनी यंदा पीक विमा काढलेला नाही, त्यांनाही सरसकट पंचनामे करून भरपाई दिली पाहिजे, अशीही मागणी त्‍यांनी केली. ते जळगाव दौऱ्यांवर आहेत

अधिक वाचा : जळगाव : फडणवीसांची रक्षा खडसेंच्या घरी सदिच्छा भेट 

विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले की, आमच्‍या सरकारने दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने वातावरणाची स्थिती व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन पीक विमा योजनेचे निकष ठरवले होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने पीक विमा योजनेचे निकष बदलले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. नवीन नियमानुसार कंपन्यांचा फायदा होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असेही ते म्‍हणाले. 

अधिक वाचा : वैद्यकीय अधिकार्‍यांची सेवा एक वर्षाने वाढली

सरकारने करप्यावरील औषध शेतकर्‍यांना द्यावे जे आताच्या सरकारने बंद केले आहे. हे सरकार नेहमीच आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवीत आहे. मात्र या महाविकास आघाडीच्या सरकारने कृषी विम्याचे सर्व  निकष बदलले, त्यामुळे शेतकर्‍यांना मदत मिळण्यास अडचण येत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. गेल्या वर्षी तर संपूर्ण हंगामात राज्य सरकारने पीक विमा योजनेसाठी टेंडर काढले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळू शकली नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

अधिक वाचा : खडसेंच्या घरात ‘कमळा’वर ‘घड्याळ’

पीक विमा योजनेसाठी केंद्र सरकारने हिस्सा भरला नाही, म्हणून राज्य सरकार शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहे. आपल्या चुका लपवण्यासाठी वेळोवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. पीक विमा योजनेसाठी राज्य सरकार निकष ठरवते. त्यानंतर टेंडर काढले जाते. त्याचवेळी केंद्र सरकार पीक विम्यासाठी आपल्या हिश्याची रक्कम जमा करते. राज्य सरकारने शेतकर्‍यांची दिशाभूल थांबवून आता सरसकट मदत करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांना आता खराब केळी शेती बाहेर काढून नव्याने रोपणी करावी लागणार आहे. त्याचाही खर्च राज्य सरकारने करावा, अशीही मागणी त्यांनी केली.

उचदा येथील शेतकरी आत्माराम पंढरीनाथ पाटील, दयाराम पंढरीनाथ पाटील  कपूरचंद चौधरी शैलेश पाटील याच्या शेतातील केळी पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी फडणवीस यांनी केली. 

 

Back to top button