‘कृष्णा’ निवडणूक : आघाडीबाबतच्या चर्चेतून मी बाहेर, पृथ्वीराज चव्हाण नाराज | पुढारी

‘कृष्णा’ निवडणूक : आघाडीबाबतच्या चर्चेतून मी बाहेर, पृथ्वीराज चव्हाण नाराज

कराड : पुढारी वृत्तसेवा

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत समविचारी पक्षांनी एकत्र यावे यासाठी मागील दोन महिन्यापासून आम्ही प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश आलेले नाही. रविवारी रात्री अखेरची बैठक झाली आणि यावेळी आपण या चर्चेतून बाहेर पडत असल्याचे संबंधितांना सांगितले आहे, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केली आहे.

मागील काही दिवसांपासून सातारा व सांगली जिल्हे कार्यक्षेत्र  असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या विरोधात काँग्रेस समर्थक स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांचे पुत्र रयत पॅनलचे सर्वेसर्वा डॉक्टर इंद्रजीत मोहिते आणि राष्ट्रवादीचे नेते संस्थापक पॅनलचे सर्वेसर्वा अविनाश मोहिते यांनी एकत्र येत आघाडी स्थापन करावी अशी भूमिका आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम आणि जिल्हा परिषद सदस्य अँड. उदयसिंह पाटील यांनी घेतली होती.

मागील दोन महिन्यांपासून यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीत दोन्ही मोहिते गटात आघाडी व्हावी म्हणून मी प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी ठरला नाही. सभासदच आता निर्णय घेतील. मी आजपासून चर्चेत सहभागी होणार नाही ही माझी भूमिका आहे. मी अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांना याबाबत सांगितले आहे. आपणास मानणाऱ्या पदाधिकारी व काही कार्यकर्त्यांनी डॉक्टर इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते या दोन्ही गटातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता आपण कोणती भूमिका घेणार ? याकडे लक्ष वेधले असता आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आपण यावर काही भाष्य करणार नाही. सभासदच योग्य तो निर्णय घेतील असे सांगत तर पृथ्वीराज चव्हाण यांनी या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले.

दरम्यान, आपण चर्चेतून बाहेर पडलो असलो तरी आघाडी होणार नाही असे मी सांगू शकत नाही. संबंधित याबाबत निर्णय घेऊ शकतात, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच आता यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता बळावली आहे.

Back to top button