गडहिंग्लज पालिका सभेत विकासकामांवर चर्चा | पुढारी

गडहिंग्लज पालिका सभेत विकासकामांवर चर्चा

गडहिंग्लज ः पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लज नगरपालिकेच्या ऑनलाईन सभेत सोमवारी विविध विकासकामांवर चर्चा झाली. यावेळी दड्डी ऑईल मिल डीपी रोड रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. याशिवाय पालिकेच्या कोव्हिड अलगीकरण केंद्राला शहरातील अनेक नागरिकांनी मदत केल्याबद्दल या सभेत त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. नगराध्यक्ष स्वाती कोरी अध्यक्षस्थानी होत्या.

प्रारंभी नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांनी गडहिंग्लज पालिकेसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल खा. संजय मंडलिक यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. नगराध्यक्ष कोरी यांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्याची विनंती केली. यावेळी बांधकाम विभागाच्या विषयावर चर्चा झाली. यामध्ये तातडीने प्रक्रिया टेंडर पूर्ण करून कामे मार्गस्थ लावण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी केल्या. नदीघाटावरील हायमास्ट दिवे तसेच अन्य कामाबाबत भद्रापूर यांनी सूचना केल्या असून पहिल्या टप्प्यात आलेल्या निधीतून नदीघाटाचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी केली.

या विषयावर नगराध्यक्ष कोरी यांनी याबाबत सुचविलेले बदल करून तातडीने याचे प्रस्ताव पाठवा, असे सांगितले. विरोधी पक्षनेते हारुण सय्यद यांनी याच विषयावर सध्या नदीघाटासाठी मंजूर झालेला निधी तसेच स्वच्छता अभियानांतर्गत आलेले पैसे मिळून सांडपाणी प्रकल्पासाठी नियोजन करावे. सध्या असलेल्या सांडपाणी प्रकल्पाचे रुंदीकरण, खोलीकरण करावे, अशी मागणी केली. यावर नगराध्यक्ष कोरी यांनी स्वच्छतेच्या कामासाठी पूर्वी 14 व्या वित्त आयोगातून निधी येत होता. आता तो येत नसल्याने बक्षिसाची रक्कम यासाठी वापरण्यात येत असून, केवळ मंजूर झालेल्या पैशातूनच नदीघाटाचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

प्रभाग तीनमध्ये मंजूर केलेल्या विकासकामांमध्ये बदल करू नये, अशी मागणी सावित्री पाटील यांनी केली. यावर कोरी यांनी तुम्ही एकत्र बसून कोणती विकासकामे घ्यायची, याची चर्चा करा मग निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. हारुण सय्यद यांनी दुबार झालेले काम बदलून दुसरीकडे करण्याबाबत प्रस्ताव देत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून उरलेली सर्वच कामे पूर्णत्वास नेऊया, असे स्पष्ट केले.

नगराध्यक्ष कोरी यांनी विकासनिधी आणल्यानंतर आमच्याकडील काही कामे घ्या, असे सांगताना संख्याबळ आमचे अधिक असून, आम्ही सर्वच विषयांना मंजुरी देत आहोत, यादी करताना सर्वसमावेशक करा, अशी सूचना केली. मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी आमदार निधीतून पैसे कमी मिळतील, त्याऐवजी पालिकेला ठोक निधी मिळविणे गरजेचे असल्याचे मत मांडले.

उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी गडहिंग्लज पालिकेचे कोव्हिड अलगीकरण केंद्र सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असून, या कालावधीत अनेक रुग्णांना अनेक रुग्णांना बरे करून घरी पाठविण्यात आले. उपचारानंतर परतणारे रुग्ण व नातेवाईकांनी पालिकेच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले आहेत. या कोव्हिड केंद्रासाठी मदत केलेल्या सर्वांचे आभारही कोरी यांनी व्यक्त केले. याशिवाय पालिकेच्या स्मशानभूमीला सर्वत्र येणारी मदत ही पालिकेसाठी चांगली असून, अन्यत्र ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट केले.

अन्य प्रस्तावांबातही तातडीने ठराव करावेत

या बैठकीत भीमनगर ते दड्डी ऑईल मिलपर्यंत डीपी रोड प्रस्तावित होता. तो रद्द करावा, असा ठराव या सभेत मांडण्यात आला. या रोडबाबतचा हा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, याशिवाय अशा प्रकारच्या अन्य प्रस्तावांबाबतही तातडीने ठराव करावेत, अशी सूचना नगराध्यक्ष कोरी यांनी मांडल्या.

स्मशानभूमीसाठी मोलाची मदत

उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी अन्यत्र एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सात ते आठ हजार खर्च येत असून, गडहिंग्लज पालिकेला सर्व ठिकाणाहून मदत येत असल्याने हा खर्च अत्यंत कमी असल्याने पालिकेवर फार बोजा पडणार नाही. त्यामुळे स्मशानभूमीसाठी सर्वांनी केलेली मदत लाखमोलाची असल्याचे स्पष्ट केले.

Back to top button