विद्यार्थ्यांसाठी लवकरच नवी विमा योजना | पुढारी

विद्यार्थ्यांसाठी लवकरच नवी विमा योजना

कोल्हापूर : अनिल देशमुख

राज्यात विद्यार्थ्यांसाठी नवी विमा योजना लवकरच अस्तित्वात येणार आहे. त्याकरिता सध्या सुरू असलेल्या ‘विद्यार्थी अपघात विमा योजने’त बदल केले जाणार आहेत. ‘विद्यार्थी जीवन विमा’ या नावाने ही नवी योजना कार्यान्वित होईल, अशी शक्यता आहे.

राज्यात विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी अपघात विमा योजना लागू आहे. मात्र, विद्यार्थी, त्यांच्या पालकांना या योजनेचा अधिक लाभ व्हावा, यासाठी या योजनेत कालानुरूप आणि योग्य बदल होणे आवश्यक आहे. यामुळे राज्य शासनाने नवी योजना निश्चित करण्याचा निर्णय घेेतला आहे. 

नवी योजना सर्व विद्यापीठ, महाविद्यालये तसेच तंत्रशिक्षण विभागाकडील सर्व पदवी-पदविका महाविद्यालयांतील सर्व विद्यार्थ्यांसाठी समान असेल, असे तिचे स्वरूप राहणार आहे. याकरिता जुन्या योजनेचा अभ्यास करणे आणि त्यात बदल सुचवून नवी विमा योजना तयार करण्यासाठी राज्य शासनाने उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

या समितीकडून सध्या विद्यापीठ व महाविद्यालयस्तरावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये गटविमा या शीर्षाखाली सध्या किती शुल्क आकारले जाते. सध्याच्या योजनेत समाविष्ट असणार्‍या बाबी, प्रस्तावित नव्या योजनेत काय समाविष्ट करावे, विमा प्रीमियम किती कमी ठेवता येईल, क्लेम करण्याची प्रक्रिया कशी सुलभ करता येईल. तंत्रज्ञानावर आधारित विमा सुविधा तसेच या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुलभ प्रणाली विकसित करणे आदींचा अभ्यास करून विविध शिफारशीसम नव्या योजनेचा अहवाल दि. 2 सप्टेंबरपर्यंत राज्य शासनाला सादर करणार आहे. 

विद्यार्थी अपघात विमा योजनेत होणार बदल : साथरोगाचा समावेश होणार

नव्या विमा योजनेत साथरोग प्रतिबंधक विषयाचाही लाभ देण्यासाठी अभ्यास केला जाणार आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विमा योजनेत अशा आजारांचाही समावेश होणे काळाची गरज होती. त्याद़ृष्टीने राज्य शासनाने नव्या विमा योजनेत साथरोगांचाही समावेश करण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

Back to top button