पुरातन मूर्तींचा खजिना भाविकांसाठी होणार खुला | पुढारी

पुरातन मूर्तींचा खजिना भाविकांसाठी होणार खुला

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा ; दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वर्षभरातून दीड ते दोन कोटी भाविक येत असतात. आता या भाविकांना शेकडो वर्षांपूर्वीच्या पुरातन मूर्तींचा खजिना पाहण्यासाठी खुला होणार आहे. याकरिता मंदिरात दालन उभारण्यात आले असून, भाविकांना काचेतून या मूर्तींचे दर्शन घेता येणार आहे.

हिंदू धर्मात प्राचीन काळापासून एखाद्या घराण्याचा वंश संपला की, त्या घराण्यातील पूर्वांपार चालत आलेल्या देव्हार्‍यातील देव हे एखाद्या मंदिरात अर्पण केले जायचे. वंशच खुंटल्यावर या कुलदेवतांवर कुलाचार करणे अशक्य होऊन जायचे. पूर्वीच्या काळापासून ही प्रथा पाळली जात आली आहे. पंढरपूर हे पूर्वीपासून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो 

लोकांचे श्रद्धास्थान असल्याने ही मंडळी आपले देव विठ्ठल मंदिरात आणून देत. येथे बैरागी कुटुंब गेल्या 18 पिढ्यांपासून या मूर्ती स्वीकारून त्याचे पूजन करत आले होते.

अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे नामदेव महाद्वार बांधण्यापूर्वी 1997 पर्यंत येथे ‘33 कोटी देवता मंदिर’ महाद्वारात होते. बैरागी यांच्या 18 पिढ्या गेल्या 700 वर्षांपासून येथे या मूर्ती घेण्याचे व त्यांचे पूजन करायचे काम करीत होता. यानंतर महाद्वाराचे बांधकाम करताना हे ‘33 कोटी देवता मंदिर’ पाडून या सर्व पुरातन मूर्ती मंदिर समितीने ताब्यात घेतल्या होत्या. याच मूर्ती मंदिरातील एका खोलीत ठेऊन त्याचे पूजन होत होते. 

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी व प्रशासनाने या मूर्ती पुन्हा एकदा बाहेर काढून यातील अतिशय पुरातन आणि दुर्मीळ मूर्ती वेगळे करायचे काम केले आहे. यात शेकडो वर्षांपूर्वीच्या कृष्ण, महादेव, गणेश, विष्णू, बालाजी यासह देवीच्या विविध रूपांतील कोरीव मूर्ती बाजूला काढल्या आहेत. यातील काही मूर्ती तर 700 ते 1 हजार वर्षांपूर्वीच्या असून या पंचधातू, तांबे, पितळ अशा धातूंपासून बनवलेल्या भरीव मूर्ती आहेत.

काही मूर्ती एक फुटाच्या, तर काही दोन फूट उंचीच्या आहेत. श्रीकृष्णाची विविध रूपे असलेल्या या कोरीव धातूंच्या मूर्ती अतिशय देखण्या व मौल्यवान आहेत. यात गरुडाची मूर्ती, महिषासूरमर्दिनीची मूर्ती, रिद्धी-सिद्धी-गणेश, पार्वतीमातेसह विराजमान महादेव अशा अनेक दुर्मीळ मूर्ती आहेत. गोपाळकृष्णाच्या मूर्तीजवळ गायी उभ्या असलेली मूर्तीही अशीच देखणी आहे. एक किलोपासून 12 किलो वजनापर्यंत या मूर्ती असून अनेक लहान मूर्ती मात्र प्रशासनाने बाजूला ठेऊन दिल्या आहेत. 

आता या मूर्ती  वेगळ्या केल्यावर विठ्ठल सभा मंडपात या मूर्ती  ठेवण्यासाठी एक दालन बनवले आहे. या काचेच्या दालनात या पुरातन मूर्ती  भाविकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. सध्या कोरोनामुळे विठ्ठल मंदिर बंद असले तरी मंदिर खुले झाल्यानंतर या देखण्या पुरातन मूर्ती  पाहण्याचा आनंद देशभरातील भाविकांना घेता येणार आहे. मंदिर समितीने पुरातन मूर्तींचे दालन उभारल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

मंदिरात विविध देव-देवतांच्या 250 ते 300  मूर्ती आहेत. यातील काही मूर्ती या एक ते दोन फुटाच्या आहेत. यातील सुमारे 80 मूर्ती निवडण्यात आल्या आहेत. या मूर्ती मंदिरात बनविण्यात आलेल्या दालनात ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व मूर्ती काचेतून पाहता येणार आहेत.

– विठ्ठल जोशी, कार्यकारी अधिकारी, मंदिर समिती


 

Back to top button