सलग तिसर्‍या दिवशी नागपुरात कोरोनाने मृत्यू नाही | पुढारी

सलग तिसर्‍या दिवशी नागपुरात कोरोनाने मृत्यू नाही

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मागील काही कोरोना रूग्णांच्या संख्येत आली घट रविवारीही कायम राहिली आहे. दुसऱ्या लाटेत संसर्गाची विक्रमी उसळी घेणाऱ्या नागपूर शहरात तब्बल १३३ दिवसांनतर सलग तीनही दिवस एकही मृत्यू नोंदविले न जाण्याची आजवरची पहिली वेळ ठरली आहे. रविवारी सलग तिसर्‍या दिवशी  नागपुरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. एकेकाळी एकाच दिवशी तब्बल ११३ मृत्यू झालेल्या नागपुरात तिन दिवसांपासून एकही मृत्यू झालेला नाही. तर रविवारी नागपुर जिल्ह्यात ३९ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

यापैकी २६ रूग्ण शहरातील तर १३ रूग्ण ग्रामिण भागातील आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूची मोठी संख्या अनुभवणाऱ्या नागपूर जिल्ह्याला आता दिलासा मिळालाय. गेल्या दोन दिवसांपासून आटोक्यात आलेला करोना मृत्यूचा दर सलग तिसऱ्या दिवशी रविवारी नियंत्रणात राहिला आहे. 

प्रशासनाची उपाययोजना व टाळेबंदीमुळं कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. त्याचबरोबर दिलासादियाक बाब म्हणजे कोरोना मृतांच्या संख्याही आटोक्यात येत आहे. त्यामुळं प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं चित्र आहे.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर हॉटस्पॉट ठरला होता. दैनंदिन रुग्णसंख्याही ५ ते ६ हजारांच्या घरात नोंदवली गेली होती. काही दिवस हा आकडा ८ हजाराच्या घरात गेला होता. मात्र, आता कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यात जिल्हा आरोग्य प्रशासनाला यश आलं आहे.  संक्रमण साखळीचा वेगही मंदावला आहे. नागपुर जिल्ह्यातून आज तपासलेल्या ८८५७ नमुन्यांपैकी ३९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

नव्याने करोनाची लागण झालेल्या ३९ जणांसोबतच रविवारी १३४ बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विषाणूचे संक्रमण झाल्यापासून आजपर्यंत ३ लाख ३४ हजार ७८४ जणांना संक्रमण झाल्याचे निदान करण्यात आले. त्यातील ३ लाख २८ हजार ६०८ बाधितांनी विषाणूवर मात केली.

Back to top button