

पिंपरी: प्लॅस्टिक कॅरी बॅगनंतर पॉलिप्रॉफलिन (नॉन वोवेन) कॅरी बॅग हे पर्यावरणपूरक आणि टिकाऊ पर्याय मानले जात आहे. शहरातील किराणा दुकान, कपड्याची दुकाने, प्रदर्शन, ब्रँडेड स्टोअर्स, मिठाईची दुकाने, भाजी विक्रेते, फळविक्रेते आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. ही बॅग पूर्णत: बायोडिग्रेबल (विघटनशील) नसल्यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. यावर बंदी घालण्याची मागणी पयार्वरवणप्रेमींकडून केली जात आहे. (Latest Pimpri chinchwad News)
प्लास्टिक बॅग बंदीनंतर मोठ्या प्रमाणात या पॉलिप्रॉफलिन (नॉन वोवेन) बॅगचा वापर सुरू झाला आहे. अगदी या पिशव्या तयार करणारे व्यावसायिकदेखील मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. विक्रेते वस्तू देण्यासाठी आणि ग्राहक वस्तूंची ने-आण करण्यासाठी या बॅगांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना ही कापडी पिशवीच आहे असे वाटते.
पॉलिप्रॉफलिन (नॉन वोवेन) बॅग म्हणजे काय?
पॉलिप्रॉफलिन हे एक थर्मोप्लास्टिक पॉलिमर आहे, जे मजबूत, हलके आणि पुनर्वापर करता येण्याजोगे असते. या बॅग सामान्यत: नॉन वोवेन फॅब्रिकपासून बनविल्या जातात, जे प्लॅस्टिकसारखे दिसते पण अधिक टिकाऊ आणि पुनर्वापरक्षम असते. या बॅगचा पुनर्वापर करता येतो, प्लॅस्टिकच्या तुलनेत अधिक मजबूत आणि फाटण्याची शक्यता कमी असते. बॅगवर ब्रँडिंग किंवा डिझाइन सहज छापता येते. जरी हे प्लॅस्टिपासून बनलेले असले तरी सिंगल युज प्लॅस्टिकच्या तुलनेत कमी हानिकारक आहे.
पॉलिप्रॉफलिन बॅगच्या मर्यादा
हे पूर्णत: बायोडिग्रेबल (विघटनशील) नाही, त्यामुळे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. जर योग्य पद्धतीने पुर्नवापर किंचा रिसायकल न केले, तर हेही पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकते. पॉलिप्रॉफलिन नावाच्या थर्मोप्लास्टिकपासून ही बनविली जाते. जी थर्मल, रासायनिक किंवा यांत्रिक प्रक्रियेव्दारे तयार होते.
कायदेशीर बाबी
सरकारने 1 जुलै 2022 पासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. पॉलिप्रॉफलिन बॅग सध्या बंदीच्या श्रेणीत येत नाहीत, पण त्याचा वापर पर्यादित आणि जबाबदारीने करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार अशा बॅग्सच्या उत्पादनासाठी नोंदणी असणे आवश्यक आहे.
पॉलिप्रॉफलिन (नॉन वोवेन) बॅगमध्येदेखील एक प्रकारचे प्लास्टिकच आहे. काही दिवसांनी त्याचे तुकडे पडतात. या बॅगा बऱ्याच ठिकाणी वापरल्या जातात. हे पर्यावरणास धोकादायक आहे. प्लास्टिप्रमाणे भंगारमध्ये देता येत नाही. त्यामुळे पुनर्निर्माण करणेदेखील कठीण आहे.
उमेश वाघेला, निसर्ग अभ्यासक
कापडी बॅगमध्ये गोणपाट म्हणतो त्या फक्त पर्यावरणपूरक आहेत. बाकी सर्व बॅगामध्ये प्लास्टिक आहे. पॉलिप्रॉफलिन (नॉन वोवेन) हा दिसायला फक्त कापडी पिशवी आहे असे दिसते; पण हा प्लास्टिकचाच एक प्रकार आहे. याचा परत कचराच बनतो जो विघटनशील नाही.
प्रशांत राऊळ, पर्यावरणप्रेमी