

पिंपरी: सायंकाळी अवकाळी पाऊस तर दुपारी कडक ऊन यामुळे शहरात सर्दी, खोकला, तापाने आजारी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मनपाचे दवाखाने आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मनपा वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीमध्ये ऑक्टोबरमध्ये 34 हजार 88 तापाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये मलेरियाचे 3 आणि डेंग्यूचे 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. (Latest Pimpri chinchwad News)
डासांचा प्रादुर्भाव वाढला
यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पाऊस व बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडते तर मधूनच कधी थंडी जाणवते, तर कधी वातावरण ढगाळ होऊन पाऊस पडायला लागतो. या बदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे अंग आणि डोकंदुखी आदी आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. अचानक वाढलेला गारवा आरोग्याला बाधक ठरत आहे. मोठ्यापासून ते लहानांमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच, कचरा तशाच साचून राहत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळेच संसर्गजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
ही घ्या काळजी
डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या
लहान मुलांचे लसीकरण झाले आहे की नाही हे तपासा
सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा करा
एका रुग्णासाठी आणलेले औषधे दुसऱ्या रुग्णास देऊ नका