

पिंपरी: केंद्र सरकारच्या दरबारी असलेला इंद्रायणी, पवना नदी सुधार प्रकल्पावर सकारात्मक निर्णय झाला असून, नव्या वर्षात या प्रकल्पाला चालना मिळणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या या प्रकल्पावर लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. परिसरातील 120 गावांत सांडपाणी शुध्दीकरण प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे नदी सुधारणेस मोठा हातभार लागेल. (Latest Pimpri chinchwad News)
890 कोटी रुपये खर्च अपेक्षित
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील इंद्रायणी आणि पवना या दोन नदी सुधार प्रकल्पाचा मोठा टप्पा पीएमआरडीएने हाती घेतला आहे. या प्रकल्पात 87 किलोमीटर लांब इंद्रायणी तर, 35 किलोमीटर लांब पवना नदीसुधार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी सुमारे 890 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्राधिकरणाकडून इंद्रायणी सुधार प्रकल्पांतर्गत येणारा भागाचा सर्वंकष विकास आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आला आहे. तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला असून, त्या माध्यमातून केंद्राकडे तो मंजुरीसाठी आहे. केंद्राकडून त्यास तत्वतः मान्यता मिळाली आहे. मान्यतेसाठी पीएमआरडीएचे पथक दिल्लीत गेले होते.
231 गावांमध्ये सांडपाणी वाहिन्या टाकण्यात येणार
पीएमआरडीएने सद्यस्थितीत सल्लागारमार्फत आराखड्याची तपासणी करून घेतल्याने निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. नव्या वर्षात त्याचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणातील एकूण 231 गावांमध्ये सांडपाणी वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी लोकसंख्येच्या अनुषंगाने तेथे सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्पात 120 गावांत या आराखड्यानुसार कामे करण्यात येणार असून, त्यासाठी तीनशे कोटी रुपये अंदाजित खर्च येऊ शकतो.
एनआरसीडीकडे अंतिम मान्यतेसाठी सादर
इंद्रायणी आणि पवना या दोन्ही प्रकल्पातील प्रस्ताव हा केंद्र सरकारच्या अंतर्गत एनआरसीडीकडे सादर करण्यात आला आहे. इंद्रायणी प्रकल्पातील उपस्थित केलेल्या शंका आणि त्रुटी दूर करून तो पुन्हा पाठविण्यात आला होता. यासाठी केंद्राकडून 60 तर, राज्य सरकारकडून 40 टक्के निधी मिळणार आहे. तसेच, पवना नदी सुधार प्रकल्पांतर्गत राज्याच्या पर्यावरण विभागाकडून तो केंद्र सरकारच्या एनआरसीडीकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.
नागरी समस्या सुटणार
नदीसुधार प्रकल्पांतर्गत सांडपाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार असल्याने सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळणार नाही. प्रक्रिया केल्यानंतरच हे पाणी नदीपात्रात सोडण्यात येईल. त्यामुळे या परिसरातील नागरी समस्या सुटण्यास मदत होईल. तसेच, या प्रकल्पामुळे नदीप्रदूषण रोखण्यास मदत होईल.
लवकरच दोन्ही प्रकल्पाच्या कामांचा निविदा काढून काम हाती घेण्यात येईल. प्रामुख्याने नदी प्रदूषण रोखणे हा त्यामागील हेतू आहे. त्याचा वेळोवेळी आढावादेखील घेण्यात येत आहे.
डॉ. योगेश म्हसे, आयुक्त, पीएमआरडीए