

पिंपरी: भाजपच्या महिला पदाधिकारी मारहाणप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अखेर भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, येत्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला तोटा होऊ नये म्हणून वरिष्ठाकडून राजीनामा घेत असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. (Latest Pimpri chinchwad News)
गुरुवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे राजीनामा पाठवण्यात आलेला आहे. संबंधित महिला पदाधिकाऱ्यांनी चिंचवड पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत अनुप मोरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनुप मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यामध्ये महायुती तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे हा प्रकार भाजपला राजकीय तोटा ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवर नाराजीदेखील व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, अनुप मोरे यांनी पक्षाचे अध्यक्ष यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की आमचे कुटुंब गेल्या 40 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहे. बूथ अध्यक्ष ते भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आहे. मी व आमचा परिवार सदैव पक्षासोबत राहणार आहे. माझ्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपासून माझ्यावर खोटे आरोप केले जात असून, माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचादेखील उल्लेख पत्रामध्ये केला आहे.