

संतोष शिंदे
पिंपरी : नागरिकांची फसवणूक करण्यासाठी पुन्हा एक नवे तंत्र अवलंबले असून, आता ‘कॉल फॉरवर्डिंग स्कॅम’च्या माध्यमातून नागरिकांना गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत. या नव्या पद्धतीने अनेकांना फसविण्यात येत असल्याने पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.(Latest Pimpri chinchwad News)
या फसवणुकीत सायबर गुन्हेगार विविध कारणे सांगून नागरिकांना त्यांच्या मोबाईलवरील कॉल्स दुसऱ्या क्रमांकावर ‘फॉरवर्ड’ करण्यास सांगतात. नागरिकांनी तसे केल्यास त्यांच्या मोबाईलवर येणारे ओटीपी, बँक व्यवहार, यूपीआय पुष्टीकरण कॉल्स थेट गुन्हेगारांकडे वळवले जातात. त्यानंतर हे गुन्हेगार त्या माहितीचा वापर करून बँक खात्यांतील रक्कम चोरतात किंवा वैयक्तिक माहिती मिळवतात. अनेक वेळा सायबर चोर केवायसी अपडेट, सिम कार्ड समस्या किंवा बँक पडताळणी अशा कारणांनी नागरिकांना विशिष्ट कोड डायल करण्यास सांगतात. हे कोड सामान्यत: ‘*21’ किंवा ‘*401’ ने सुरू होतात आणि शेवटी मोबाईल नंबर जोडला जातो. उदाहरणार्थ, *401(मोबाईल नंबर) किंवा *21(मोबाईल नंबर)असे कोड टाकल्यास तुमचे सर्व कॉल्स दुसऱ्या व्यक्तीकडे वळवले जातात.
ओटीपी चोरी : बँक, यूपीआय, क्रेडिट व डेबिट कार्ड व्यवहारांशी संबंधित ओटीपी थेट फसवणूक करणाऱ्यांकडे पोहोचतात.
मोबाईल कॉल्स न मिळणे : तुमच्या मोबाईलवर येणारे सर्व कॉल्स आपोआप दुसऱ्या व्यक्तीकडे वळतात.
सोशल इंजिनिअरिंग : गुन्हेगार मित्र, नातेवाईक किंवा व्यावसायिक संपर्कातून विश्वास संपादन करून मोठी फसवणूक करतात.
गोपनीयता धोक्यात : बँक, नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित कॉल्सही गुन्हेगारांकडे पोहोचू शकतात.
अनोळखी व्यक्ती सांगेल तो णडडऊ कोड कधीही डायल करू नका.
तुमच्या मोबाईलवर *#21# डायल करून कॉल फॉरवर्डिंग सक्रिय आहे का हे तपासा.
कॉल फॉरवर्डिंग सुरू असल्यास त्वरित बंद करा.
सर्व कॉल फॉरवर्डिंग थांबवण्यासाठी ##002# हा कोड डायल करा.
मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा.
संशयास्पद व्यवहार झाल्यास ताबडतोब बँक शाखेशी संपर्क साधून खाते लॉक किंवा फीझ करा.
नागरिकांनी अशा कॉल्स किंवा संदेशांकडे दुर्लक्ष करून सतर्क राहावे. कोणताही कोड डायल करण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्यावी. थोडीशी दक्षता घेतली, तर मोठ्या फसवणुकीपासून बचाव शक्य आहे.
डॉ. शिवाजी पवार, उपायुक्त, पिंपरी