Pimpri Chinchwad Digital Workers: पिंपरी-चिंचवडच्या उद्योगनगरीत कामगारांचे बदलते रूप; ‘मजूर’ ते ‘डिजिटल ऑपरेटर’

एआय, ऑटोमेशन, CNC-PLC आणि सेन्सर्सच्या वाढत्या वापरामुळे कौशल्यांची नवी मागणी; अपस्किलिंगवर कंपन्यांचा भर
Industrial Workers Digitalization
Industrial Workers DigitalizationPudhari
Published on
Updated on

बजरंग मासाळ

पिंपरी: तंत्रज्ञानाच्या युगात उद्योगनगरीमधील कारखान्यांतील मशिनरीत आमुलाग्र बदल झाला.. आता कामगारही बदलतोय! काही वर्षांपूर्वीपर्यंत मशिन चालविण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव आणि तांत्रिक माहिती पुरेशी मानली जात होती; मात्र, उद्योगनगरीतील उत्पादन प्रक्रियेत डिजिटल स्क्रीन, ऑटोमेशन, सेन्सर्स, सीएनसी, पीएलसी आणि एआय आधारित प्रणालींचा वापर वाढल्याने कामगारांच्या तंत्रज्ञान कौशल्याची व्याख्याही बदलली आहे. कामगार आता तंत्रज्ञानासोबत डिजिटल माहिती समजून घेत आहेत आणि 'एआय' च्या मदतीने कामाची पद्धत अधिक वेगाने आत्मसात करतानाचे चित्र उद्योगनगरीमध्ये दिसू लागले आहे.

Industrial Workers Digitalization
Pimpri Chinchwad Ganeshotsav DJ: पिंपरी-चिंचवडमध्ये डीजेला ७० टक्के नागरिकांचा विरोध; ‘आवाजाची मर्यादा पाळा’चा तरुणांचा सूर

पिंपरी-चिंचवड, भोसरी, तळवडे, चाकण आणि परिसरातील औद्योगिक पट्ट्यात या बदलाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. उत्पादन क्षेत्रात नव्या मशिनरीचा वापर वाढत असताना, त्या हाताळण्यासाठी कंपन्यांकडून कामगारांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे 'मशिनरीचे अपग्रेडेशन'सोबत 'मनुष्यबळाचे अपस्किलिंग' हा उद्योगक्षेत्रातील महत्त्वाचा बदल ठरत आहे.

डिजिटल स्क्रीनवरून मशिनचे नियंत्रण

आधुनिक उत्पादन मशिनरीमध्ये डिजिटल कंट्रोल पॅनेल आणि टचस्क्रीनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मशिनचे तापमान, उत्पादनाचा वेग, कार्यक्षमता, अलर्ट, एरर कोड यांसारखी माहिती स्क्रीनवर उपलब्ध होते. त्यामुळे कामगाराला केवळ मशिन सुरू-बंद करण्याचे ज्ञान पुरेसे राहिलेले नाही. स्क्रीनवरील माहिती वाचणे, एरर ओळखणे, योग्य कमांड देणे, उत्पादन प्रक्रियेतील बदल समजून घेणे आणि सुरक्षा नियमांचे पालन करणे, ही कौशल्येही आता कामाचा भाग बनली आहेत.

Industrial Workers Digitalization
Pratiksha Kharat: बर्फाच्छादित पर्वतांवर तिरंगा अभिमानाने उंचावला!

मशिनची माहिती 'एआय'च्या 'एका प्रश्नावर'

मशिनचे ऑपरेशन मॅन्युअल, तांत्रिक सूचना आणि प्रक्रिया डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्यास एआय आधारित सॉफ्टवेअरच्या मदतीने त्यातील आवश्यक माहिती शोधणे आणि समजून घेण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. एखाद्या मशिनची काम करण्याची पद्धत काय, एरर कोडचा अर्थ काय? ऑपरेशनपूर्वी कोणती काळजी घ्यायची? एखाद्या प्रक्रियेची क्रमवारी काय? अशा प्रश्नांची माहिती डिजिटल प्रणालीतून शोधण्याची पद्धत कामगार शिकत आहेत. यामुळे मॅन्युअलच्या अनेक पानांमधून माहिती शोधण्याऐवजी योग्य प्रश्न विचारून आवश्यक माहिती मिळविण्याचे कौशल्य विकसित होत आहे. अर्थात, AIकडून मिळालेली माहिती अंतिम तांत्रिक निर्णय मानण्याऐवजी कंपनीचे SOP, अधिकृत मॅन्युअल, अभियंते आणि सुरक्षा नियम यांना प्राधान्य देण्यावरही भर दिला जात आहे.

आयटीआयचे विद्यार्थीही बनताहेत प्रशिक्षक

उद्योगांमध्ये तंत्रज्ञानाधारित कौशल्यांची मागणी वाढत असल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनाही त्यानुसार आपली भूमिका बदलावी लागत आहे. आयटीआयचे विद्यार्थी केवळ प्रशिक्षण घेणारे न राहता काही ठिकाणी कंपन्यांमधील कामगारांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याची भूमिका बजावणार आहेत.

Industrial Workers Digitalization
Moshi Garbage Depot: मोशी दुर्घटनेस 55 दिवस उलटूनही कचरा समस्या कायम; सभागृहात नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

उद्योगांसमोरील नवे आव्हान

मशिनरी खरेदीपेक्षा ती चालविणारे कुशल मनुष्यबळ महत्त्वाचे! आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करून उत्पादन प्रक्रियेत बसविणे हा बदलाचा एक भाग आहे. मात्र, त्या तंत्रज्ञानाचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यामुळे पुढील काळात कंपन्यांना नवीन भरतीसोबत विद्यमान कामगारांचे 'री-स्किलिंग' आणि 'अपस्किलिंग' यावरही मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. उद्योगनगरीत आता फक्त मशिनरी बदलत नाहीये; कामगाराची ओळखही बदलतेय. हातातील कौशल्याला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड मिळत असून, 'मेहनती कामगार' आता 'तंत्रज्ञानस्नेही कुशल कामगार' बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

'मजूर' ते 'डिजिटल ऑपरेटर'

उद्योगनगरीतील बदलाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम कामगाराच्या भूमिकेवर होत आहे. पूर्वी विशिष्ट मशिनवर दीर्घकाळ काम करण्याचा अनुभव हेच प्रमुख कौशल्य मानले जात होते. आता त्यासोबत डिजिटल प्रणाली समजून घेणे, डेटाचे प्राथमिक विश्लेषण करणे, तांत्रिक अडचणी ओळखणे आणि ऑटोमेशनशी जुळवून घेणे आवश्यक ठरत आहे. यामुळे पारंपरिक कामगाराचे रूपांतर हळूहळू 'डिजिटल ऑपरेटर' किंवा बहुकौशल्यधारक कामगारात होत आहे.

Industrial Workers Digitalization
Krishna Janmashtami: गोकुळाष्टमीसाठीच्या साहित्याने सजली बाजारपेठ; बालगोपालांच्या पोशाखांना मागणी

कामगार विरुद्ध नव्हे; कामगारासोबत ‘एआय’

एआय आणि ऑटोमेशनमुळे रोजगाराच्या स्वरूपात बदल होणार असला तरी त्याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी मानवी मनुष्यबळाची गरज संपणार असा नाही. उलट, आधुनिक मशिनरी चालविण्यासाठी, तिच्यावर देखरेख ठेवण्यासाठी, गुणवत्ता तपासण्यासाठी आणि डिजिटल प्रणाली समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानस्नेही मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. उद्योगांमध्ये त्यामुळे आता एक नवी समीकरणे तयार होत आहेत. मशिन अधिक स्मार्ट, तर कामगार अधिक कुशल. उत्पादनक्षमता, गुणवत्ता आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी तंत्रज्ञान आणि मानवी कौशल्य यांची सांगड घालण्यावर उद्योगांचा भर आहे.

'स्मार्ट कामगार' बनण्यासाठी कोणते स्कील महत्त्वाचे

• डिजिटल स्क्रीन व कंट्रोल पॅनेल हाताळणी

• सीएनसी, पीएलसी व ऑटोमेशनची प्राथमिक माहिती

• सेन्सर व डिजिटल अलर्ट समजून घेणे

• मशिनमधील एररची प्राथमिक ओळख

• एआय सॉफ्टवेअरवर तांत्रिक माहिती शोधणे

• एआय ला योग्य प्रश्न विचारून माहिती मिळविणे

• डिजिटल डेटा व उत्पादनाची माहिती वाचणे

Industrial Workers Digitalization
Pimpri Chinchwad Family Dispute: आलिशान घरांतही ‘गृहकलह’ची धग; पैसा, प्रतिष्ठा असूनही नात्यांत ताण

आयटीआयमधील आमचे विद्यार्थी आता कंपन्यांमध्ये जाऊन कामगारांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देत आहेत. उद्योगांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यानुसार कौशल्यांची गरज वाढत असल्याने कंपन्यांकडूनही आम्हाला प्रशिक्षणासाठी संपर्क केला जात आहे. येणाऱ्या काळात केवळ शारीरिक मेहनत करणाऱ्या कामगारांपेक्षा तंत्रज्ञानासोबत जुळवून घेत काम करू शकणाऱ्या कुशल कामगारांची मागणी अधिक वाढेल. सध्या उद्योगक्षेत्रात त्याची सुरुवात झालेली दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून उद्योगांच्या बदलत्या गरजांनुसार तयार करण्यावर आमचा भर आहे.

ज्योत सोनवणे, प्रभारी प्राचार्य औद्योगीक प्रशिक्षण संस्था आयुक्त.पिंपरी-चिंचवड

औद्योगिक क्षेत्रात तांत्रिकदृष्ट्या कुशल मनुष्यबळाला दिवसेंदिवस महत्त्व प्राप्त होत आहे. या बदलत्या गरजा लक्षात घेऊन केंद्र शासनाकडून वेळोवेळी आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. सन २०२५ मध्ये बहुतांश व्यवसायांचे अभ्यासक्रम सुधारित करण्यात आले असून, अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देण्याचे काम आयटीआयच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगांच्या बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारी कौशल्ये मिळत आहेत. त्याचा थेट फायदा औद्योगिक आस्थापनांना होत असून, त्यांना अधिक कुशल आणि ‘अपस्किल’ झालेले मनुष्यबळ उपलब्ध होत आहे.

शशिकांत पाटील, प्राचार्य तथा विभागप्रमुख, औद्योगिक प्रशिक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news