

पिंपरी: श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात गोकुळाष्टमी शुक्रवारी असल्यामुळे शहरातील बाजारपेठा साहित्यांनी सजल्या आहेत. पिंपरी, चिंचवड येथील मुख्य बाजारात कृष्णजन्मासाठी लागणारे लाकडी व मेटलचे पाळणे, बालकृष्णाच्या मूर्ती, बासरी, मुकुट, मोरपंख, वैजयंती माळा आणि आकर्षक पोशाख विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
मुकुट, बासरी, मोरपीसांना मागणी
शहरातील शाळा आणि सोसायट्यांमध्ये गोकुळाष्टमी साजरी केली जाते. त्यामुळे लहान मुलां - मुलींना राधा कृष्णाची वेशभूषा आवर्जून केली जाते. याकरिता बालगोपालांसाठी खास पितांबरी, जरीकाम असलेले अंगरखे, राधा-कृष्णाच्या जोडीसाठी खास ड्रेस बाजारात उपलब्ध आहेत. वेशभूषेबरोबर मुकुट, बासरी आणि मोरपीस यांना मागणी आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मथुरा-वृंदावन स्टाईल पोशाख आणि इको-फ्रेंडली मातीच्या मूर्तींना जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गोकुळाष्टमीनिमित्त घरोघरी श्रीकृष्ण जन्माचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याची लगबग सुरू झाली आहे.
शहरात दहीहंडीची जय्यत तयारी; निवेदक, बाऊंसर, नृत्यकलाकारांनाही मागणी
पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा लाखोंच्या दहीहंडी फुटणार आहेत. त्याची जय्यत तयारी शहरात सुरू आहे. गर्दी खेचून आणण्यासाठी मोठ-मोठे हिंदी व मराठी सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे.
गोविंदा पथकांचा उत्साह, बघ्यांची गर्दी, दहीहंडी फोडण्याची एकमेकांत वाढणारी चुरस, गाण्यांवर थिरकणारे तरुण, सेलिब्रिटी, चाहत्यांची वाढती गर्दी अशा उत्कंठावर्धक वातावरणात दहीहंडी उत्सव होणार आहे. मंडळामध्ये उत्साहाचे वातावरण असून, आता त्यासाठी चुरस लागणार आहे.
येणार्या दहीहंडी उत्सवामध्ये निवेदक, बाऊंसर, नृत्य व गायक यांना मागणी वाढली आहे. सणानिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे अनेक छोट्या आणि मोठ्या कलाकारांचे उत्पन्नाचे साधन असते. शहरामध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. याची जय्यत तयारी सुरू आहे.
निवेदकांना आले सुगीचे दिवस
कोणत्याही कार्यक्रमात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम निवेदक करतो. यंदा दहीहंडीच्यानिमित्ताने शहरातील निवेदकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. निवेदकांच्या तारखादेखील फुल झाल्या आहेत. तसेच, यानिमित्ताने निवेदकांची चांगली कमाईदेखील होणार आहे.
सुरक्षेसाठी बाऊंसर
दहीहंडीसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या सेलिब्रिटींच्या सुरक्षेसाठी महिला व पुरुष बाऊंसर यांना मागणी असते. प्रेक्षकांच्या गर्दीतून स्टेजपर्यंत सुरक्षित नेण्यासाठी बाऊंसरची आवश्यकता असते. कारण बर्याचदा प्रेक्षकांकडून गैरवर्तन होण्याची शक्यता असते. यासाठी सेलिब्रेटींच्या सुरक्षेसाठी बाऊंसरचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे.
ऑर्केस्ट्राला डिमांड
दहीहंडी कार्यक्रमाला सायंकाळच्या सुमारास सुरुवात होते, परंतु रात्री 9 वाजल्यानंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होतो. तोपर्यंत गायक आणि नृत्य कलाकार हे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. यासाठी ऑर्केस्ट्रा बोलावला जातो. दहीहंडीनिमित्त ऑर्केस्ट्राला डिमांड वाढली आहे.