

संतोष शिंदे
पिंपरी: उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात पूर्वी मजूर, स्थलांतरित अथवा अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांच्या गृहकलहाच्या तक्रारी पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात येत होत्या. मात्र, मागील काही वर्षांत हे चित्र बदलले असून, उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि समाजात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कुटुंबांमध्येही पती-पत्नी तसेच सासर-माहेरच्या नात्यांतील वाद टोकाला जात असल्याचे समोर येऊ लागले आहे.
आलिशान बंगले, महागड्या गाड्या, व्यवसाय, जमीन-जुमला आणि सर्व सुखसोयी असतानाही कौटुंबिक वर्चस्व, आर्थिक अपेक्षा, मालमत्तेतील हिस्सा आणि अहंकारातून नात्यांमध्ये कटुता निर्माण होऊ लागली आहे.
या वादातून जीवघेणी मारहाण आणि आत्महत्येसारख्या गंभीर घटना घडल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ‘आर्थिक सुबत्ता म्हणजे सुखी संसार’ ही धारणा मोडीत निघू लागली आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या भरोसा सेलपर्यंत पोहोचणाऱ्या अनेक तक्रारी उच्चशिक्षित दांपत्यांच्या असल्याचे नोंदीतून स्पष्ट झाले आहे. लग्नानंतर बदलणाऱ्या अपेक्षा, सासर-माहेरचा अतिहस्तक्षेप, जोडीदारावर नियंत्रण ठेवण्याची वृत्ती, आर्थिक व्यवहारांतील मतभेद आणि संवादाचा अभाव ही गृहकलहामागील प्रमुख कारणे असल्याचे भरोसा सेलमध्ये ड्युटी करणारे पोलिस सांगतात.
याव्यतिरिक्त नोकरी, व्यवसाय अथवा मालमत्तेमुळे निर्माण होणारा आर्थिक अहंकारदेखील काही कुटुंबांमध्ये संघर्षाचे कारण बनत आहे. लग्नाच्यावेळी झालेला खर्च अथवा दिलेल्या वस्तूंपेक्षा रोख रक्कम, वाहन, व्यवसायासाठी आर्थिक मदत किंवा माहेरच्या संपत्तीतून हिस्सा मिळण्याच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत.
या वाढत्या अपेक्षांमुळे वाद सुरू झाल्यास पती-पत्नीच्या नात्यासोबतच दोन्ही कुटुंबांमधील संबंधही ताणले जात आहेत. परिणामी, वेळीच संवाद अथवा समुपदेशन न झाल्यास किरकोळ वाटणारे मतभेद गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे नुकत्याच घडलेल्या घटनांमधून समोर आले आहे.
शहरात घडलेली महत्त्वाची प्रकरणे
वैष्णवी हगवणे
वाकड परिसरातील कसप्टेवस्ती येथील माहेर असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर हुंडा आणि आर्थिक मागणीचे गंभीर आरोप समोर आले. लग्नात सोने, आलिशान वाहन आणि इतर वस्तू दिल्यानंतरही पुढे मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. या प्रकरणात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या सक्षम तसेच राजकीय-सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील या घटनेने राज्यभर चर्चा निर्माण केली.
शिल्पा गवारे
वाकड येथील शिल्पा गवारे यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर माहेरच्या वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा आणण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. यापूर्वीही माहेरच्या कुटुंबीयांकडून आर्थिक मदत करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्रास सुरू राहिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या काही व्यक्तींना अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
प्रियांका उमरगेकर-घोलप
राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील प्रियांका उमरगेकर-घोलप यांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक छळाचे आरोप समोर आले होते. विवाहात महागडी कार, सोने तसेच इतर खर्च केल्यानंतरही संसारोपयोगी वस्तू आणि फर्निचरच्या कारणावरून तगादा लावल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संसार जुळवताना केवळ श्रीमंतीच नाही तर स्वभावही तपासा
लग्नापूर्वी केवळ आर्थिक स्थिती, व्यवसाय, मोठे घर किंवा सामाजिक प्रतिष्ठा पाहणे पुरेसे नसल्याचे अलीकडील घटनांमधून दिसून येत आहे. संबंधित कुटुंबाचा स्वभाव, घरातील वातावरण, स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि आर्थिक अपेक्षा समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
पती-पत्नीमध्ये मोकळा संवाद ठेवणे, सासर-माहेरचा अनावश्यक हस्तक्षेप टाळणे आणि छळाची पहिली चिन्हे दिसताच समुपदेशक किंवा पोलिसांची मदत घेणे आवश्यक ठरत आहे. विशेषतः ‘मोठे घर आहे’, ‘समाजात प्रतिष्ठा आहे’ या कारणांमुळे मुलीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरत असल्याचे समोर आले आहे.
उच्च शिक्षण आणि आर्थिक स्थैर्याबरोबर भावनिक परिपक्वता आणि परस्पर सन्मानही तितकाच महत्त्वाचा आहे. लग्नापूर्वी दोघांच्या अपेक्षा, आर्थिक नियोजन, कुटुंबीयांचा हस्तक्षेप आणि स्वतंत्र निर्णयक्षमता यावर स्पष्ट चर्चा होणे गरजेचे आहे. सातत्याने वाद होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता सुरुवातीलाच समुपदेशनाची मदत घेतल्यास अनेक प्रकरणे टोकाला जाण्यापासून रोखता येऊ शकतात.
- मनजीत संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ, पिंपरी-चिंचवड
मारहाण, पैशांसाठी दबाव, धमकी किंवा इतर शारीरिक, मानसिक छळ सुरू झाल्यास संबंधित महिलेने अथवा तिच्या कुटुंबीयांनी तो केवळ ‘घरगुती विषय’ म्हणून दडपून ठेवू नये. महिला सहाय्यक कक्ष, भरोसा सेल अथवा जवळच्या पोलिस ठाण्याशी वेळीच संपर्क साधल्यास समुपदेशनासह कायदेशीर मदत उपलब्ध होऊ शकते. वेळीच मदत घेतल्यास एखादी गंभीर घटना टाळण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो.
- सुरेखा घार्गे, पोलिस निरीक्षक, भरोसा सेल, पिंपरी-चिंचवड