Pimpri Chinchwad Ganeshotsav DJ: पिंपरी-चिंचवडमध्ये डीजेला ७० टक्के नागरिकांचा विरोध; ‘आवाजाची मर्यादा पाळा’चा तरुणांचा सूर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेवरून मतमतांतरे; पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्याची नागरिकांची मागणी
Ganeshotsav DJ Ban
Ganeshotsav DJ BanPudhari
Published on
Updated on

पिंपरी: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे; मात्र त्यापूर्वी डीजे लावण्यावरून पुण्यातील वातावरण तापले आहे. त्यामुळे उत्सवात डीजे लावायचा की नाही, यावरून एका बाजूला तरुण मंडळांचा उत्साह तर दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिलांचा विरोध. या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरात घेतलेल्या अनौपचारिक सर्वेक्षणात ७० टक्के नागरिकांनी डीजेला विरोध केला, तर ३० टक्के तरुणांनी ध्वनी मर्यादा पाळून उत्सवादरम्यान डीजेला पाठिंबा दिला. आता महापालिका आणि पोलिस काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ganeshotsav DJ Ban
Pratiksha Kharat: बर्फाच्छादित पर्वतांवर तिरंगा अभिमानाने उंचावला!

सण-उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम हे आपल्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यामुळे डीजे किंवा ध्वनिवर्धकांच्या वापराला सरसकट विरोध करण्यापेक्षा, शासनाने ठरवून दिलेल्या ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. उत्सवाचा आनंद घेताना लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्ण यांना त्रास होणार नाही, याची आयोजकांनीही काळजी घ्यावी. प्रशासनानेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका ठेवावी. उत्सवाचा उत्साह आणि नागरिकांना शांतता या दोन्हींचा समतोल राखला गेला, तरच उत्सव खऱ्या अर्थाने आनंददायी आणि सर्वसमावेशक ठरेल.

दीपक खैरनार, सामाजिक कार्यकर्ते

कोणत्याही प्रकारच्या आवाजाचे प्रदूषण रोखणे हे मानवी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यात डीजे हा अत्यंत गंभीर प्रकार सर्वच पातळ्यांवर टाळायलाच हवा. त्याचे दुष्परिणाम आता सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यापर्यंत पोचले आहे. आश्चर्य याचेच वाटते की, हे समजून, उमजूनही राजकीय पक्ष आणि प्रशासन त्याकडे अक्षम्य डोळेझाक करतात. ह्याने आपला कडेकोट निश्चितच होणार आहे.

धनंजय शेडबाळे, पर्यावरणप्रेमी

Ganeshotsav DJ Ban
Moshi Garbage Depot: मोशी दुर्घटनेस 55 दिवस उलटूनही कचरा समस्या कायम; सभागृहात नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर

शासनाने गणेशोत्सवात डीजे लावण्यासाठी मर्यादा घालून दिलेली आहे. परंतु, मर्यादा कोणी पाळत नाही. कार्यकर्ते उत्साही असतात. याचा त्रास ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीय उपचार घेणारे नागरिक, शाळेतील विद्यार्थी यांनाही त्रास होतो. तसेच, मधुमेहाचे आणि हृदयाचे आजार असणारे व्यक्तींना हृदयविकाराचा धोका निर्माण होतो . न्यायालयाने दिलेले निर्देश पाळून उत्सव साजरा केला पाहिजे, असं मला वाटतं

अण्णा जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते

डीजेच्या कर्णकर्कश आवाजापेक्षा पारंपरिक वाद्यांचा नाद अधिक सुंदर आणि संस्कृती जपणारा आहे. प्रत्येक सण-उत्सवात कर्णकर्कश आवाजाचा अतिरेक टाळून पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन द्यावे. सणांचा आनंद घ्या, पण इतरांना त्रास होईल असा आवाज नको! आपली संस्कृती, आपली परंपरा आणि पारंपरिक वाद्य यांचा सन्मान करू या.

लीना आढाव, सचिव, संस्कार भारती

Ganeshotsav DJ Ban
Krishna Janmashtami: गोकुळाष्टमीसाठीच्या साहित्याने सजली बाजारपेठ; बालगोपालांच्या पोशाखांना मागणी

सध्या भारतीय संस्कृती लुप्त होत चाललेली आहे आणि पाश्चात्त्य संस्कृती आपल्या सणांमध्ये शिरकाव करत आहे. याचेच उदाहरण म्हणजे डीजे लावून अश्लील चाळे करून नाचणे हे आपल्या संस्कृतीला शोभत नाही. मोठ्या आवाजात गाणे लावणे हे आपल्या संस्कृतीला मान्य नाही. लोकमान्य टिळकांनी सर्व समाज एकत्र यावा या उद्देशाने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरले होते, यालाच बगल दिली जाते असं मला म्हणायचं आहे.

मीना करंजवणे, नागरिक

भारतात साजरे होणारे सगळे सण उत्सव आणि जयंत्या अशा सर्व प्रकारच्या ठिकाणी डीजेवर त्वरित बंदी घातली पाहिजे. भारतीय पारंपरिक वाद्याने कार्यक्रमाची शोभा वाढते आणि आपल्या परंपरेचा उत्साह द्विगुणित होतो असा आमचा अनुभव आहे. धर्म जात पंथ या पलीकडे जाऊन आपण या समस्याकडे पाहिले पाहिजे. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात वावरत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, सण, उत्सव आणि जयंती साजरे करत असताना आपण समाजासमोर आणि खास करून नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला पाहिजे. सण-उत्सव या परंपरा साजरी करत असताना सामाजिक आणि राष्ट्रीय बांधिलकी जोपासण्याच्या भूमिकेतून खूप आवाज करणाऱ्या गोष्टींना तिलांजली दिली पाहिजे.

राजेंद्र घावटे, साहित्यिक

Ganeshotsav DJ Ban
Pimpri Chinchwad Family Dispute: आलिशान घरांतही ‘गृहकलह’ची धग; पैसा, प्रतिष्ठा असूनही नात्यांत ताण

गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. महाराष्ट्राची पारंपरिक ढोल-ताशा पथके आणि लेझीम त्यात जो उत्साह असतो, तो डीजेच्या इलेक्ट्रॉनिक आवाजात नाही. असे माझे मत आहे; पण डीजेशिवाय मिरवणुकीत तो 'जोश' येत नाही, असे तरुणांचे म्हणणे असल्याने मोठ्या प्रमाणावर डीजे लावला जातो. हा उत्सव तरुणांचा आहे त्यांनी डीजे लावावा; पण त्याचा आवाज मर्यादित असावा. थोडक्यात काय तर उत्सवही व्हावा आणि त्रासही नको, याची काळजी कार्यकर्ते घेतील, अशी अपेक्षा...

राहुल कोल्हटकर, सामाजिक कार्यकर्ते

आमच्या मंडळाने २५ वर्षांपासून पारंपरिक वाद्यांचा वापर केला आहे. आम्ही कधीच डीजे लावला नाही. आजही हलगी पथक, लेझीम पथक अशा वाद्यांचा समावेश असतो. शासनाने जी ध्वनी पातळीची मर्यादा ठरविली आहे, त्याप्रमाणे इतरांनीही तिचे पालन करावे.

राजाभाऊ गोलांडे, गांधी पेठ तालिम मित्र मंडळ, चिंचवड

डीजेच्या दणदणाटामुळे माझ्या घराच्या भिंती हादरतात. खिडकीच्या काचा कधी फुटतील असे वाटते. कानांना आणि हृदयाला ही त्रास होतो. मला हृदयविकाराचा त्रास नसताना जर इतका त्रास होतो. तर जे हृदयविकाराचे किंवा इतर आजाराचे रुग्ण आहेत त्यांना किती त्रास होत असेल. डीजेमुळे पक्षी आणि प्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. डीजेवर सामाजिक शांततेसाठी बंदी हवी.

उमेश वाघेला, पक्षीमित्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news