

विशाल विकारी
लोणावळा: मावळ तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या नगर परिषदा, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्यात याव्यात, याकरिता आमदार सुनील शेळके यांनी भाजपाकडे एक हात पुढे केला होता. भाजपानेदेखील मावळ तालुक्यात निवडणुका बिनविरोध होणार असतील तर आम्ही दोन्ही हात पुढे करायला तयार आहोत, असा प्रतिसाद दिला. त्यामुळे 'दे टाळी घे टाळी'चा प्रयोग मावळात सुरू झाला होता. मात्र, तो क्षणिक कालावधीचा ठरला. (Latest Pimpri chinchwad News)
भाजपा योग्य प्रतिसाद देत नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता पुन्हा एकदा मावळ तालुक्यामध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. अथवा जे इतर छोटे पक्ष सोबत यायला तयार आहेत त्यांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा दुसरा पर्यायदेखील पुढे आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी मावळात महायुती होण्याची शक्यता जवळपास संपली असल्याचे सांगत पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकांना पक्ष स्वबळावर अथवा स्थानिक आघाडीद्वारे होणार निवडणूक स्वबळावर स्वचिन्हावर सामोरे जाण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे.
तसेच इतर छोटे पक्ष सोबत येण्यास तयार असतील तर स्थानिक पातळीवर आघाडी करत त्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचादेखील पर्याय खुला असल्याचे त्यांनी इतर पक्षांना म्हटले आहे. त्याला प्रतिउत्तर देताना माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी देखील टाळी द्यायची का नाही हा त्यांचा प्रश्न आहे. युती होण्यानी बाट न बघता आता आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे लोणावळ्यात म्हटले आहे.
महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय व इतर पक्षांची महायुती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व इतर पक्ष यांची महाविकास आघाडी आहे. मावळ तालुक्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या तालुकाध्यक्षांनी एकत्र येत मावळ तालुक्याची निवडणूक आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचे सांगितले होते. त्यानंतर आता महायुतीमधील घटक पक्ष ही वेगवेगळे लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात लहान पक्षांना सोबत घेऊन युती किंवा आषाडी करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न पुढे यशस्वी होईल का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राजकीय इच्छुकांची वाढली भाऊगर्दी
लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. शहरामध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष असून, त्या खालोखाल कॉंग्रेस, शिवसेना व चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादी पक्ष आहे. २०१६ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहरामध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. आमदार सुनील शेळके यांच्या करिष्मामुळे यावर्षी होणाऱ्या निवडणुकीला अनेक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्यास तपार असले तरी प्रत्येक पक्ष मागील निवडणुकीमध्ये जिंकलेल्या जागांवर दावा करत आहे. त्यामुळे लोणावळा शहरामध्येदेखील युतीचा किंवा आधाडीचा प्रयोग किती यशस्वी होणार व किती राजकीय पक्ष यामध्ये सहभाग घेणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून आत्तापर्यंत ४३ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. तर राष्ट्रबादी काँग्रेस पक्षाकडून ३५ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत.
निवडणुका पक्षीय चिन्हावर की इतर ?
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषद, लोणावळा नगर परिषद, वडगाव नगरपंचायत या शहरी भागासह ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा इतिहास पाहता या ठिकाणी मागील काही निवडणूक आहे. शहर विकास आघाडी व अन्य आघाडी यांच्या माध्यमातून झाले आहेत. लोणावळा शहरातील निवडणुकांचा आजपर्यंतचा इतिहास पाहता या ठिकाणी निवडणुका या पक्षीय चिन्हावर आजपर्यंत झाले आहेत. नव्यानेच मागील काळात स्थापन झालेल्या वडगाव नगरपंचायतीची निवडणूक हीदेखील पक्षीय चिन्हावरच झाली होती. मावळ तालुक्यातील बहुतांश राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी हे तळेगाव शहरामध्ये असल्यामुळे या ठिकाणी पक्षीय चिन्हा ऐवजी आघाडी व युतीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर निवडणुका लढवल्या जातात.
लोणावळा शहरामध्ये आजपर्यंत झालेल्या निवडणुका ह्या पक्षीय चिन्हावरच झाले आहेत. प्रत्येक पक्षाला आपली ताकद आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याची संधी या निवडणुकांच्या माध्यमातून मिळत असते. युती अथवा आघाडी स्थानिक पातळीवर झाल्यास राजकीय पक्षांचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचत नाही. मावळ तालुक्यातील विधानसभा व लोकसभा या निवडणुकीच्या जागा पुती व आघाडीमध्ये विशिष्ट पक्षालाच मिळत असल्यामुळे इतर राजकीय पक्षांची चिन्हे ही मतदारांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे मावळ तालुक्यामध्ये अनेक पक्ष असले तरी नागरिकांना केवळ दोन किंवा तीनच पक्ष माहिती पडतात, अशी परिस्थिती असल्यामुळे लोणावळा सारख्या शहरांमध्ये निवडणुका या पक्षीय पातळीवर घेतल्या जातात. जेणेकरून राजकीय पक्षाचे चिन्ह व उमेदवार हा नागरिकांना माहिती व्हावा, ही यामागची संकल्पना असते.
मतदारांची पसंती कोणाला?
लोणावळा नगर परिषदेमध्ये तेरा प्रभाग असून २७ जागा आहेत. इच्छुकांची संख्या पाहता निवडणुकीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. लोणावळा शहरामध्ये प्रामुख्याने आमदार सुनील शेळके विरुद्ध माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव असाच निवडणूक सामना रंगणार आहे. दोघांनी देखील आपापल्या स्तरावर मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असल्यामुळे या निवडणुकीमध्ये कोणाच्या पारड्यात मते टाकायची याकरिता मतदारांचा कस लागणार आहे, मतदान होत असताना दोन्ही राजकीय पक्षांकडून दिले जाणारे उमेदवार, त्यांची समाजामध्ये असलेली प्रतिमा, समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान व प्रभागांमध्ये त्यांचा असलेला वावर या सर्व बाबींचा विचार करूनच मतदान होणार आहे. येत्या आठवडाभरामध्ये उमेदवारांची नावे जवळपास निश्चित होतील त्यानंतर खऱ्या अर्थीने निवडणुकीमध्ये रंगत भरणार आहे.