Traffic Accidents: ऑफिसला पोहोचण्याची घाई.. मरणाच्या दारात नेई..!
संतोष शिंदे
पिंपरी : शहरामध्ये दररोज हजारो वाहने धावत आहेत. सकाळी शाळा, कॉलेज आणि ऑफिसला जाण्याच्या तसेच सायंकाळी परतण्याच्या वेळेत रस्ते अक्षरशः गर्दीने ओसंडून असतात. या गर्दीच्या तासांमध्येच शहरात सर्वांधिक अपघाताच्या घटना घडत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. वेग, चुकीचे ओव्हरटेक, वाहन चालवताना मोबाईल वापर आणि विनाहेल्मेट गाडी चालविणे, ही चार प्रमुख कारणे बहुतांश अपघातांसाठी जबाबदार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.(Latest Pimpri chinchwad News)
मृत्यूदर वाढवणारे औद्योगिक महामार्ग
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून पाच प्रमुख महामार्ग जातात. यामध्ये पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग आणि मुंबई-बंगळुरू महामार्ग यांचा समावेश आहे. हे सर्व मार्ग औद्योगिक वाहतुकीचे केंद्र असल्याने दिवस-रात्र अवजड वाहनांची वर्दळ असते. परिणामी चाकण, देहूरोड आणि हिंजवडी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात आणि मृत्यूच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. विशेषतः कात्रज-देहूरोड बायपास हा मृत्यूचा पट्टा बनला आहे. ट्रक, टेम्पो आणि कंटेनरमधून होणाऱ्या धडकांमुळे दुचाकीस्वारांचा जीव जात आहे. रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यावर स्ट्रीटलाइट नसणे, चुकीचे पार्किंग आणि इशारे न दिसणे ही या अपघातांची मूळ कारणे आहेत.
वाहनचालकांनी हेल्मेट, सिटबेल्टचा वापर करावा. बेदरकारपणे वाहन न चालवता वेगावर नियंत्रण ठेवावे. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करू नये आणि वाहतूक नियमांचे पालन करावे. नागरिकांनी स्वतःची आणि इतरांची सुरक्षा लक्षात घेऊन जबाबदार वाहनचालक म्हणून वागल्यास अपघातांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.
डॉ. विवेक पाटील, पोलिस उपायुक्त (वाहतूक)
सुरक्षित वाहनचालकांसाठी दहा नियम
1. वेगमर्यादा पाळा; महामार्गावर 60 कि. मी. /ता. पेक्षा जास्त नको.
2. हेल्मेट व सिटबेल्टचा वापर करा.
3. मोबाईलवर बोलू नका, इयरफोन वापरू नका.
4. अचानक लेन बदलू नका.
5. ओव्हरटेक करताना हॉर्न द्या.
6. रात्री हायबीम दिवे वापरू नका.
7. थकवा, झोप आल्यास वाहन थांबवा.
8. शाळा व रुग्णालय परिसरात वेग कमी ठेवा.
9. पावसात बेकिंग अंतर वाढवा.
10. मुलांना दुचाकी चालवू देऊ नका.
अपघातांवर नियंत्रणासाठी पोलिसांनी केलेल्या तांत्रिक उपाययोजना
ई-चलान प्रणाली : सिग्नल तोडणे, नंबर प्लेट लपवणे आणि ट्रिपल सीटिंग यावर थेट चलान पाठवले जाते.
सीसीटीव्ही नेटवर्क : शहरातील 5 हजारांहून अधिक कॅमेऱ्यांतून वाहतुकीचे थेट निरीक्षण.
ब्लॅक स्पॉट मॅपिंग : गेल्या वर्षभरात 38 अपघातप्रवण ठिकाणी अतिरिक्त गस्त आणि रिफ्लेक्टर बसवले.
जनजागृती मोहिमा : शाळा, कॉलेज आणि औद्योगिक क्षेत्रात सुरक्षित वाहनचालक बना अभियान राबवले.
वाहनचालक समुपदेशन : नियमभंग करणाऱ्यांना दंडासह मार्गदर्शन सत्रात सहभागी होणे बंधनकारक.
सकाळच्या वेळी सर्वांधिक अपघात
वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 8 या वेळेत सर्वाधिक अपघाताच्या घटना घडतात. या दोन वेळांत बस, कार आणि दुचाकींची मोठी वर्दळ असते. चालकांना वेळेवर पोहोचायचे असल्याने ते घाईगडबडीत सिग्नल तोडतात, झेबा क्रॉसिंगकडे दुर्लक्ष करतात आणि अचानक लेन बदलतात. अशा बेशिस्त वाहनचालकांमुळे दररोज अपघातांची साखळी वाढत आहे ’रश अवर’मध्ये दर तासाला सरासरी तीन ते चार अपघातांची नोंद होते. त्यापैकी जवळपास 40 टक्के अपघात प्राणांतिक ठरत आहेत.
नशा अन् मोबाईल
नशेत वाहन चालवणाऱ्यांमुळे गंभीर अपघात घडत आहेत. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे किंवा मेसेज करताना लक्ष विचलित होऊन अनेकजण स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतात. 18 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणच या अपघातांचे सर्वाधिक बळी ठरत आहेत. त्यामुळे वाहतूक शाखेने ’ड्रंक अँड ड्राइव्ह’, मोबाईल वापर व ट्रिपल सीटिंगवर विशेष कारवाया सुरू केल्या आहेत.
तंत्रज्ञानाची साथ, पण शिस्त हवीच
पिंपरी, निगडी, थेरगाव, चिंचवड स्टेशन चौक आणि हिंजवडी फेज-3 येथे नवीन सेन्सर-आधारित सिग्नल बसविण्यात आले आहेत. वाहनांची गर्दी ओळखून हे सिग्नल आपोआप ग््राीन टाइम वाढवतात. ’रॉंग साइड ड्रायव्हिंग’ करणाऱ्यांना त्वरित अलार्मचा इशारा दिला जातो. या प्रणालींमुळे काही प्रमाणात नियंत्रण मिळाले असले तरी नागरिकांनी शिस्त न पाळल्यास कोणतेही तंत्रज्ञान उपयोगी पडत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

