

लोणावळा: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-वरुन लोणावळ्याकडे येणारा हायवा (एमएच-14/एचयू-0567) हा वलवण एक्झिट येथील उतार व वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील लोखंडी दुभाजक तोडून पलटी झाला. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Pimpri chinchwad News)
महादेव कांबळे (वय 50, सध्या रा. कुसगाव बुद्रूक, लोणावळा मावळ, मूळ रा. लातूर) असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे. चालकाने प्रसंगावधान राखत गाडीवरील नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचदरम्यान वाहनाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ही दुर्घटना बुधवारी (दि. 15) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार अनिल शिंदे तसेच खंडाळा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून त्वरित उपाययोजना केल्या. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मृत चालकाला बाहेर काढले. दरम्यान, अपघातग्रस्त हायवा क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून मार्ग मोकळा करण्यात आला. या अपघातामुळे काही काळ जुन्या महामार्गावरील वाहतूक मंदावली होती.