

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले असल्याची चर्चा माझ्या कानावर आली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असताना कर्ज घेण्यास माझा पूर्वीपासूनच विरोध आहे. त्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सूचना केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवार (दि. 15) सांगितले. (Latest Pimpri chinchwad News)
रहाटणी येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी तत्कालीन आयुक्त सिंह यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्याची माहिती मलाही समजली आहे. किती कर्ज घेतले, कोणत्या कामांसाठी घेतले आहे, याची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त हर्डीकर यांना दिले आहेत. मी पिंपरी-चिंचवडमध्ये 25 वर्षे काम केले आहे. कधीही महापालिकेने एका रुपयाचे कर्ज घेतले नाही. आशिष शर्मा आयुक्त असताना कर्ज घेण्याची कुजबूज सुरू होती. मी त्याला विरोध केला. उत्पन्न वाढवा. गळती कमी करा. उत्पन्न वाढले की व्यवस्थित काम करता येत असल्याचे मी बजावले होते, असे सांगत पवार यांनी शेखर सिंह यांच्या कामकाजावर संशय व्यक्त केला.
महापालिका निवडणुकीपर्यंत श्रावण हर्डीकर हेच आयुक्त
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनुभव आहे. त्यांच्याकडे महापालिकेचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे आता, बिहार निवडणुकीचे निरीक्षक म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेची निवडणूक होईपर्यंत हर्डीकर आयुक्त म्हणून राहतील. निवडणूक झाल्यानंतर महापालिकेस नवीन आयुक्त मिळेल, असे पवार म्हणाले.
निवडणूक आयोगास भेटण्याचा सर्वांचा अधिकार
महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाकडे तीन पक्षांसाठी निवडणूक घेत असल्याचा आरोप केल्याबद्दल पवार म्हणाले की, लोकशाहीत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा सर्वांचा अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून घ्यावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.
रस्ते वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जागा ताब्यात घेणार
लोकसंख्या तसेच, वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यासाठी रस्ते रुंदीकरण करण्यात येते. तसेच, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, मेट्रो, विमानतळ, घनकचरा व्यवस्थापन व विविध विकासकामांसाठी जागा ताब्यात घेण्याची गरज पडते. त्याकरिता शेतकऱ्यांकडून पुन्हा पुन्हा जागा घेण्याची वेळ येते; मात्र रेडिरेकनर दरापेक्षा अधिक नुकसान भरपाई दिली जात आहे. रस्ते काही हवेत तयार होत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिंजवडीत अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांना ताकीद देऊ
हिंजवडी पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या नैसर्गिक नाले व ओढ्यांच्या मार्गातील अडथळे दूर केले आहेत. त्या मार्गातील अनधिकृत बांधकामेही पाडली आहेत; तसेच दिव्यांचे खांब आणि ट्रान्स्फॉर्मरही स्थलांतरित केले आहेत. पाऊस थांबल्याने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. अवजड वाहनांवर कारवाई करण्याबाबत वाहतूक पोलिसांना ताकीद दिली जाईल, असे पवार यांनी सांगितले.
आमच्या पक्षाचे बळ वाढवत आहोत
महाविकास आघाडीत आम्ही पक्ष म्हणून काम करीत होतो. आता, महायुतीत आहे. पक्षासाठी काम करत आहोत. अखेर जनतेचा कौल महत्त्वाचा आहे. नगरसेवक हे त्या प्रभागांचे प्रतिनिधित्व करतात. झपाट्याने लोकसंख्या वाढल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्यासाठी अनेक प्रकल्प मंजूर केले आहेत. जनतेने साथ दिल्यास आम्ही शहराचा आणखी कायापालट करू, असे ते म्हणाले.