

मोशी: जाधववाडीतील जाधव कमानीपासून गेलेल्या नैसर्गिक नाल्यांमध्ये ड्रेनेजचे पाणी सोडल्याने परिसरातील सोसायटीधारकांसह बैठ्याघरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीसह आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये ड्रेनेजचे पाणी सोडू नका, अशी मागणी नागरिकांकडून पालिका प्रशासनाकडे सातत्याने केली जात आहे. (Latest Pimpri chinchwad News)
दुर्गंधी, डासांचा त्रास, आरोग्यावर होणारा परिणाम यामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे लवकरात-लवकर ही समस्या सोडवावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
दुर्गंधीने नागरिक त्रस्त
महापालिकेच्या माध्यमातून नैसर्गिक नाल्यामध्ये ड्रेनेजलाईन सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. हा नाला अनेक सोसायटी, बैठे घर यांना लागून गेल्याने रहिवाशांना दुर्गंधी, डासांचा त्रास सहन करावा लागतो आहे. डेंग्यूच्या आजारांना अनेकजन बळी पडले आहेत. नाल्यामध्ये ड्रेनेजचे पाणी बंद पाईपमधून घेऊन जा म्हणजे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होणार नाही, अशी मागणी केली जात आहे. जवळ महापालिकेच्या शाळा आहेत, त्या मुलांनाही दररोज दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
नैसर्गिक नाल्यात ड्रेनेजचे पाणी सोडले जात असल्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. ड्रेनेजचे पाणी नाल्यात सोडू नये, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आम्ही केली आहे; परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
विशाल आहेर, स्थानिक
नाल्यामध्ये सांडपाणी सोडल्याने आम्हाला दुर्गंधीमळे जेवण्याचीसुध्दा इच्छा होत नाही. यावर महापालिका प्रशासनाने तोडगा काढावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्याप या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. डास आणि दुर्गंधीचा त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे. याचा आरोग्यावर परिणाम होत आहे.
मोहन घाडगे, रहिवाशी
जाधववाडीतून जाणारा नाला काही ठिकाणी बंदिस्त आहे. त्यामुळे त्याठिकाणी काम करता येत नाही. काही ठिकाणी नाल्यावर बांधकामे आहेत. या नाल्याचे काम करण्यासाठी ड्रेनेजसह सर्व लाईन बाहेर काढून रस्त्याच्याकडेला शिफ्ट करण्याचे काम होणार आहे. यासाठी निविदाप्रक्रिया राबविली जात आहे. निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यावर कंत्राटदार कोणी आलेले नाही. दिवाळीनंतर ही प्रक्रिया पूर्णत्वास जाईल. लवकरच काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
रचना दळवी, जल:निस्सारण विभाग, महापालिका