‘ब्रिस्क’ला २४ कोटी ६५ लाख देण्याचे आदेश | पुढारी

‘ब्रिस्क’ला २४ कोटी ६५ लाख देण्याचे आदेश

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने (गोडसाखर) ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीला 24 कोटी 65 लाख रुपये द्यावेत, असा आदेश सहकार खात्याचे अतिरिक्त सचिव अरविंदकुमार यांनी दिला आहे. ही रक्कम तीन महिन्यांत कंपनीला द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. यानुसार 21 ऑगस्ट 2021 पर्यंत ही रक्कम कारखान्याला द्यावी लागणार आहे. 

कारखान्याकडून मात्र याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली नसून सहकार सचिवांचा आदेश व कारखाना सुरू करण्यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी संचालक मंडळाची बैठक शुक्रवार, दि. 4  रोजी बोलविली आहे. यावेळी या विषयावर जोरात चर्चा होण्याची शक्यता आहे.

ब्रिस्कने 2014 पासून गोडसाखर कारखाना दहा वर्षांसाठी चालवण्यासाठी घेतला होता; मात्र कराराची दोन वर्षे शिल्लक असताना कंपनीने कारखाना सोडला. यावेळी कंपनीने येणे-देणेबाबत सहकार सचिवांकडे ताळेबंद दिला होता. कंपनी व कारखानादरम्यानच्या करारात सभासदांना 10 किलो साखर देण्याचे नमूद होते. परंतु, संचालकांच्या मागणीनुसार कंपनीने उत्पादकाला 50 किलो साखर दिली आहे. 

साखर आयुक्तांनी 24 कोटी 65 लाख ही रक्कम कारखान्याकडून वसूल करून कंपनीला द्यावयाची आहे. वेळेत पैसे न दिल्यास कंपनीला 8 टक्के व्याज द्यावे, याशिवाय कारखाना अन्य कंपनीला चालवण्यास द्यावयाचा असल्यास त्या कंपनीने ब्रिस्कचे पैसे अदा करावेत, असा आदेश दिला आहे.

जादा खर्चाची मागणी फेटाळली

करारात नसतानाही दिलेल्या साखरेपोटी कंपनीचा 9 कोटी 17 लाख रुपये जादा खर्च द्यावा, ही मागणी सचिवांनी मान्य केली असून कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी कंपनीने केलेल्या 9 कोटी 37 लाखांचा खर्च आणि कामगारांच्या वाढीव पगारापोटी जादा खर्च केलेल्या 1 कोटीची कंपनीची मागणी फेटाळण्यात आली.

Back to top button