मान्सून केरळात दाखल | पुढारी | पुढारी

मान्सून केरळात दाखल | पुढारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मान्सून अखेर गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर त्याचा वेगवान प्रवास सुरू झाला आहे. मात्र, महाराष्ट्रात पोहोचण्यास त्याला सात ते आठ दिवस लागणार आहेत. 10 जूनच्या सुमारास तो तळकोकणात येईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

अनुकूल वातावरणामुळे मान्सून गुरुवारी केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाला आणि त्याने पुढे जाण्यास गती घेतली आहे. अरबी समुद्र, पुद्दुचेरी, दक्षिण कर्नाटक रॉयलसीमा या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. 

महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा भागात 4 आणि 5 जून रोजी व संपूर्ण विदर्भात 4 ते 7 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ पुकारण्यात आला आहे. 4 आणि 5 जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यात 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि वादळी पाऊस होईल, 

असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

यंदा ‘तौक्‍ते’ आणि ‘यास’ चक्रीवादळांच्या तडाख्यामुळे मोसमीपूर्व पावसाने दाणादाण उडवून दिली. ढगांतील बाष्प वादळांनी खेचून घेतल्याने मान्सून यंदा तीन ते चार दिवस उशिराने केरळमध्ये दाखल झाला आहे. तो 1 जूनलाच केरळात येणे अपेक्षित होते. आता त्याचा पुढचा प्रवासही लांबणार असून, तळकोकणात 8 जूनऐवजी 10 जूनला मान्सून बरसू लागेल. 15 ते 20 जून दरम्यान तो संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याची चिन्हे आहेत. 

 

Back to top button