उघड्या फ्यूज पेट्यांमुळे धोका | पुढारी | पुढारी

उघड्या फ्यूज पेट्यांमुळे धोका | पुढारी

नेसरी ः पुढारी वृत्तसेवा

नेसरी (ता. गडहिंग्लज) परिसरातील अनेक गावांतील वीज वितरणच्या फ्यूज पेट्या उघड्या पडल्या आहेत. याशिवाय कानडेवाडी, सरोळी, अर्जुनवाडी, तळेवाडी, वाघराळी, बिद्रेवाडी गावांमध्ये अनेक ठिकाणी विजेच्या तारा सैल पडल्याने यापासून शेतकरी, नागरिकांच्या जीवितास धोका संभवत आहे. 

जमिनीपासून अवघ्या अडीच-तीन फुटांवर या पेट्या असतात. गावांसह शेतांमध्येच या पेट्यांची अवस्था बिकट आहे. मध्यवस्तीत वर्दळीच्या ठिकाणी अशा उघड्या पेट्या दिसून येतात. लहान मुले रस्त्यावरच खेळतात. त्यांना यापासून अधिक धोका उद्भवत आहे. 

शिवारातील परिस्थिती याहून भयानक असून, वीजपुरवठा खंडित झाल्यास वीजवितरणच्या कर्मचार्‍यांची वाट न पाहता काही शेतकरी थेट स्वतः फ्यूज बदलण्याचा आटापिटा करतात. तांत्रिक माहितीअभावी त्यांनाही धोका संभवत आहे.

कानडेवाडी येथील चिंदके यांच्या घराशेजारील विद्युत तारा तर जमिनीकडे झुकल्या आहेत. याकडे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष झाले आहे. अनेक ठिकाणच्या खांबांना झाडाच्या फांद्या तसेच वेलींनी वेढा दिला असून, पावसाळ्यापूर्वी ही झुडपे हटविणे गरजेचे आहे. याशिवाय फ्यूज पेट्या बदलण्यासह सैल पडलेल्या तारा यांची कामे गतीने करावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

कानडेवाडी येथे बारा वर्षांपूर्वी वीजवाहिनीचे लोखंडी खांब जीर्ण झाल्याने यासाठी पर्यायी सिमेंटचे खांब उभारले आहेत. मात्र, त्यानंतर बारा वर्षे उलटूनही अद्याप या खांबावर वीज तारा जोडण्यात आलेल्या नाहीत.

Back to top button