मी देशसेवेत, पण माझे कुटुंब असुरक्षित | पुढारी

मी देशसेवेत, पण माझे कुटुंब असुरक्षित

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

गौंडवाड (ता. बेळगाव) येथे शेत जमिनीच्या वादातून आतापर्यंत दोन वेळा माझ्या कुटुंबावर हल्ला झाला आहे. देशाच्या रक्षणासाठी मी सीमेवर लढतो; पण इकडे गावात माझे कुटुंब सुरक्षित नाही, याची खंत वाटते. ती शेतजमीन जर खरोखर गावची असेल, तर न्यायालयीन लढा देऊन ती घ्यावी. याला माझा काहीही आक्षेप नाही; पण माझ्या घरावर हल्ला करून कुटुंबावर बहिष्कार घालून गावातील काही लोक कायदा हातात घेत आहेत, त्यामुळे माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी आर्मी जवान दीपक पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

गौंडवाड येथे देवस्थानची शेत जमीन असल्याच्या दाव्यावरून गाव व चार कुटुंबांमध्ये वाद सुरू आहे. या वादातून 6 जून रोजी रात्री या चार कुटुंबांवर गावातील पंचवीस ते तीस जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या कुटुंबातीलच एक तरुण दीपक पाटील हे आर्मी जवान आहेत. कुटुंबावर हल्ला झाल्याचे समजताच ते सुट्टी घेऊन बेळगावला आले आहेत.

बुधवारी त्यांनी कुटुंबीयांसह जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन याबाबतची आपली समस्या मांडली. दीपक पाटील म्हणाले, गावातील शेत जमिनीचा वाद आहे. ती जमीन आपल्याला न्यायालयामार्फत मिळाली आहे. ती जमीन आमची नाही, असे जर गावकर्‍यांना वाटत असेल तर त्यांनी न्यायालयीन लढा देऊन ती परत घ्यावी. आमचा त्याबाबत आक्षेप राहणार नाही. परंतु गावातील काही गुंड प्रवृत्तीचे तरुण व त्यांना साथ देणारी ज्येष्ठ मंडळी आमच्या कुटुंबाला सातत्याने लक्ष करीत आहेत. डिसेंबरमध्येही आमच्या घरावर हल्ला झाला होता. यानंतर पुन्हा सहा जून रोजी हल्ला करून घरासमोरील दोन दुचाकी जाळल्या, घरातील टीव्ही फोडली. अन्य साहित्याची नासधूस करत घरावरील कौलेही  फोडली.

माझ्या कुटुंबावर बहिष्कार

गावातील लोक माझ्या कुटुंबाला सातत्याने त्रास देत आहेत. संपूर्ण कुटुंबावर बहिष्कार घातला असून माझ्या मुलांनी किंवा आई-वडिलांनी दुकानला जायचे नाही, मंदिरात जायचे नाही, असे निर्बंध घातले आहेत. याशिवाय आमच्या कुटुंबाशी कोणी बोलले तर त्यांना एक हजार रुपये दंडाचे फर्मान सुनावले आहे. हा सर्व प्रकार पाहता माझ्या कुटुंबाने वाळीत टाकण्यासारखी काय चूक केली आहे?असा प्रश्न दीपक पाटील यांनी केला आहे. माझ्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्याचे पत्र ग्रामस्थांनी अथवा जिल्हाधिकार्‍यांनी मला द्यावे म्हणजे ते पत्र दाखवून मी आर्मीतील सेवेचाही राजीनामा देतो.

चौकट पोलिसांकडूनही दुजाभाव

मी देश रक्षणासाठी सीमेवर जाऊन लढायचे आणि गावात माझे कुटुंब सुरक्षित नाही हा कसला न्याय? पोलीसही आमची फिर्याद घेत नाहीत आणि हल्लेखोरांवर कडक कारवाई करत नाहीत. दोनवेळा हल्ला होऊनही पोलिसांनी राजकीय दबावापोटी हल्लेखोरांवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे आपण जिल्हाधिकार्‍यांकडे न्याय मागण्यासाठी आलो आहोत, असे जवान दीपक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

Back to top button