अठरा वर्षांवरील लसीकरणाचे आदेशच नाहीत | पुढारी

अठरा वर्षांवरील लसीकरणाचे आदेशच नाहीत

सांगली : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दि. 7 जून रोजी केलेल्या घोषणेनुसार सोमवारपासून अठरा वर्षांवरील व्यक्तींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. मात्र अठरा वषार्ंवरील व्यक्तींच्या लसीकरणाबाबत अद्याप राज्य शासनाकडून जिल्हास्तरावर काहीच आदेश आलेले नाहीत. दरम्यान, राज्य शासनाच्या एका आदेशानुसार शनिवारपासून 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले आहे. अठरा वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण केव्हा सुरू होणार, याबाबत संभ्रमावस्था  कायम आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी दि. 7 जून रोजी केलेल्या घोषणेनुसार 18 वर्षांवरील अनेक व्यक्तींनी लसीकरणासाठी सोमवारी महापालिका यंत्रणेकडे चौकशी केली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. राज्य शासनाने अद्याप 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाचे आदेश दिले नसल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. लसींचा तुटवडा हीच मोठी समस्या आहे. 

30 ते 45 वयोगटातील नोंदणी लसीकरण केंद्रावरच

राज्य शासनाने नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार 30 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. शनिवारी पहिल्या दिवशी 276 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. महापालिका क्षेत्रात 19 आरोग्य केंद्रात ही सुविधा उपलब्ध केली आहे. प्रत्यक्ष केंद्रावर नोंदणीद्वारे हे लसीकरण केले जात आहे. ऑनलाईन नोंदणीला फाटा देण्यात आला आहे.

घोषणांचा सुकाळ; लस कुठेय?

लसीकरणाबाबत शासनस्तरावरून घोषणांचा सुकाळ आहे. मात्र प्रत्यक्ष लस कुठे आहे? सोमवारी लसींअभावी लसीकरण केंद्रे बंद होती. सोमवारी दुपारी चार-साडेचार वाजल्यानंतर लस उपलब्ध होणार होती.  त्यानंतर जिल्हा लस भांडारातून आरोग्य केंद्रांना लस वितरित होईल आणि मंगळवारी लसीकरण होईल. लस उपलब्ध नसल्याने एकआड एक दिवस लसीकरण होत आहे. लसींचा तुटवडा हीच सध्या मोठी डोकेदुखी बनली आहे.

मनपा क्षेत्रात 2 लाखांवर व्यक्तींना नाही एकही डोस

महापालिका क्षेत्रात 18 वषार्ंवरील व्यक्तींची संख्या 3 लाख 30 हजार 985 आहे. त्यापैकी 1 लाख 13 हजार 260 व्यक्तींना पहिला डोस दिला आहे, तर 34 हजार 520 व्यक्तींना पहिला आणि दुसरा डोस दिला आहे. पहिला डोस मिळाल्याचे प्रमाण 34 टक्के, तर दोन्ही डोस मिळाल्याचे प्रमाण 10 टक्के इतके आहे. महापालिका क्षेत्रातील 2 लाख 17 हजार 725 व्यक्तींना अद्याप लसीचा एकही डोस मिळाला नाही. पहिला व दुसरा डोस देण्याचे उद्दिष्ट 6 लाख 61 हजार 970 इतके आहे. त्यापैकी दि. 18 जून 2021 अखेर 1 लाख 47 हजार 780 डोस दिले आहेत. 

Back to top button