

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: 'पेगासस' प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. 'पेगासस' प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका ज्येष्ठ वकील मनोहर लाल शर्मा यांनी दाखल केली आहे. भारतात पेगासस स्पायवेअरच्या खरेदीवरच बंदी घालावी, अशीही मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे.
अधिक वाचा
पेगासस स्पायवेअरच्या वापर हा विरोधी पक्ष नेते, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि काही अधिकारी यांची हेरगिरी
करण्यासाठी केला जात होता, असा दावा अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टसह जगभरातील अन्य १६ माध्यमांनी केला होता. यानंतर देशातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली हाेती.
अधिक वाचा
ज्येष्ठ वकील मनोहर लाल शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, 'पेगासस हेरगिरी प्रकरण अत्यंत गंभीर आहे. लोकशाही, न्यायव्यवस्था आणि देशाच्या सुरक्षेवरच हा हल्ला आहे. मोठ्या प्रमाणावर कोणतीही जबाबदारी न घेता करण्यात आलेली देखरेख ही बाबच अनैतिक आहे.
अधिक वाचा
'पेगासस'चा वापर हा केवळ चर्चा ऐकण्यासाठीच होत होता, असे नाही. तर संबंधित व्यक्तीच्या जीवनातील सर्व डिजिटल माहितीच गोळा केली जात होती. या प्रकारामुळे राष्ट्रीय सुरक्षाच धोक्यात येवू शकते. मानवाधिकारासाठी ही मोठी समस्या होवू शकते, असेही याचिकेमध्ये नमूद केले आहे.
'पेगासस' प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) तर्फे करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तर अन्य विरोधी पक्ष याप्रश्नी केंद्र सरकारने खुलासा करावा, अशी मागणी करीत आहेत. हेरगिरीचा असा कोणाताही प्रकार सुरु नव्हता, असा दावा केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.
हेही वाचलं का ?