नवी दिल्ली; पुढारी वृत्तसंस्था : माजी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि नागरी उड्डाण मंत्री
ज्योतिरादित्य शिंदे हे सफदरजंग रोडवरील सरकारी बंगल्यासाठी आमने-सामने आले आहेत.
मागील महिन्यात मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी रमेश पोखरियाल यांनी आरोग्याचे कारण देत मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर ज्योतिरादित्य शिंदे यांना मंत्रीपद मिळाले.
सध्या पोखरियाल यांचे वास्तव्य असणार्या बंगलाच मिळावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. तर पोखरियाल यांनी हा बंगला सोडण्यास नकार दिला आहे. त्यांना या बंगल्यात वास्तव्याची परवानगीही मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ज्योतिरादित्य यांचे वडील माधवराव शिंदे हे राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. त्यावेळी सध्या पोखरियाल यांचे वास्तव्य असलेल्या सफदरजंग रोडवरील लुटियन दिल्लीमधील बंगल्यामध्ये शिंदे कुटुंबीयांचे अनेक वर्ष वास्तव्य होते. या बंगलाशी ज्योतिरादित्य शिंदे यांचे भावनिक नाते निर्माण झाले आहे.
त्यामुळे त्यांनी या बंगल्याची मागणी केली आहे. स्वत: ज्योतिरादित्य शिंदे यांचे वास्तव्य २०१९च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत याच बंगल्यात होते. त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. यानंतर त्यांना हा बंगला सोडावा लागला होता.
मागील वर्षी ज्योतिरादित्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांना दिल्लीत तीन सरकारी बंगल्याचे पर्याय
सुचविण्यात आले होते. मात्र त्यांनी तिन्हीही पर्याय नाकारले होते. सध्या त्याचे वास्तव्य हे आनंद लोक येथील आपल्या खासगी निवासस्थानामध्ये आहे.
सरकारी बंगल्यासाठी नेत्यांचा असणारा आग्रह नवा नाही. रामविलास पासवान यांना मिळालेल्या बंगल्यात वास्तव्याचा लोक शक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांचा आग्रह कायम होता. मात्र त्यांना बंगला सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचलं का ?