पुढारी ऑनलाईन डेस्क : आज नागपंचमी. श्रावण महिन्यातील महत्वाचा सण. या सणाला नागदेवतेची मनोभावे पूजा-अर्चा केली जाते. त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्यदेखील केला जातो. हा पदार्थ महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या प्रत्येक घरात तयार केली जाते. पुरणपोळी म्हंटलं की, सर्वांना महाराष्ट्र आठवतो. जणू काही हा पदार्थ महाराष्ट्राचाच आहे. पण, तसं नाहीये. हा पदार्थ महाराष्ट्राचा नाही, तर तो नेमका कुठला? त्याचा इतिहास काय? ते पाहू या…
पुरणपोळी महाराष्ट्राची नाही, तर कुठली आहे?
खरंतर देवा-धर्मांच्या कार्यक्रमावेळी किंवा सणावाराला हा पदार्थ आवर्जुन केला जातो. पण, त्याचा संदर्भ कोणत्याही धार्मिक ग्रंथात वेदाकालीन असो किंवा पुराणात कुठेही सापडत नाही.
भैशज्य रत्नावली आणि भावप्रकाश या दोन ग्रंथात गोड भरलेली पोळी असा उल्लेख आहे. त्यामुळे हाच तो पदार्थ असावा, असा कयास अभ्यासक बांधतात. आता ही पुरणपोळी कर्नाटकातून कशी आली?
तर, एखादं पिक जिथं जास्त येतं तिथंच, त्या पिकाचे विविध पदार्थ केले जातात. पुरणपोळीत वापरला जाणारं प्रमुख पिक म्हणजे हरभरा हे आहे. उत्तर कर्नाटक भाग हा काळ्या मातीचा भाग आहे. सुपीकता आणि पाण्याची ओल पकडून ठेवण्याची क्षमताही जास्त आहे.
अशा अनुकूल परिस्थितीत कर्नाटकात डाळींचे पिक सर्वात जास्त घेतलं जात होतं. त्यामध्ये हरभरा प्रामुख्याने घेतला जात होता. त्यामुळे पहिल्यांदा पुरणपोळीचा तयार झाली ती उत्तर कर्नाटकात.
कोल्हापुरमुळे महाराष्ट्रात आली पुरणपोळी?
पुरणपोळी महाराष्ट्राची झाली त्यामध्ये कोल्हापुरचा सर्वात मोठा वाटा आहे. कारण, शाहु महाराजांचे राज्य बेळगावपर्यंत (कर्नाटक) पसरलेले होते. व्यापाराच्या निमित्ताने दोन राज्यातील लोकांमध्ये स्थानिक संस्कृतीची देवाण-घेवाण झाली.
त्यामुळे मराठी आणि कन्नड लोकांच्या देवाण-घेवाणीतून हा पदार्थ महाराष्ट्रात आला, असंही अभ्यासकांनी मत मांडलं आहे. पहिल्यापासून कर्नाटक आणि महाराष्ट्राचे संबंध पूर्वापार चालत आलेले आहे.
दुसरं कारण असं की, कोल्हापुरातील महालक्ष्मी ही उत्तर कर्नाटकातील अनेक भाविकांची कुलदैवत आहे. त्यामुळे या पदार्थाचा नैवेद्य करण्याची परंपराही इथूनच सुरू झाली असेल, असाही एक तर्क मांडला जातो.
पुरणपोळी महाराष्ट्राच्या संस्कृती इतकी रुजली आहे की, आता ती महाराष्ट्राची पुरणपोळी, असं संबोधलं जाऊ लागलं आहे. इतकंच नाही तर पानीपत, जपान यांसारख्या ठिकाणीही ही पुरणपोळी महाराष्ट्राची म्हणून ओळखली जाते.
पहा व्हिडीओ : मुंबईची पावभाजी घरच्या घरी कशी तयार कराल?